इन्शुरन्स फॉर ऑल’.....
इन्शुरन्स फॉर ऑल’ : आयआरडीएआयचे अध्यक्ष श्री. अजय सेठ यांच्याकडून विमा साक्षरता आणि ग्राहक जागृतीसाठी कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन
जीवन विमा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी एकत्र आल्या; ग्राहकांमध्ये जीवन विम्याबाबत जागरूकता, स्वीकार्हता वाढवण्यावर भर
भारत, ३० जून २०२६ : ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ ही संकल्पना पुढे नेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) चे अध्यक्ष श्री. अजय सेठ यांच्याकडून ग्राहक जागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. जीवन विम्याशी संबंधित संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणे आणि ग्राहकांमध्ये जागरूकता वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी जीवन विमा क्षेत्रातील नामवंत मान्यवर एकत्र आले. देशभरातील व्यक्ती आणि कुटुंबांसाठी जीवन विमा अधिक सुलभ, समजण्यास सोपा आणि अधिक उपयुक्त बनविण्यावर त्यांनी भर दिला.
प्रकाशित कॉमिक बुक मालिका जीवन विम्याबाबत माहिती अधिक सोपी आणि सर्वांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी तयार करण्यात आली आहे. जीवन विमा खरेदी करण्याचा विचार करणारे तसेच जीवन विमा घेणे टाळणारे अनेक जण हा विषय गुंतागुंतीचा मानतात. ही बाब लक्षात घेऊन या मालिकेत विवाहित महिलांचा मालमत्ता हक्क कायदा (MWP), वेव्हर ऑफ प्रीमियम (WoP) आणि क्रिटिकल इलनेस रायडर्स यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तांत्रिक भाषेऐवजी या संकल्पना दैनंदिन जीवनाशी निगडित कथांमधून समजावून सांगितल्या आहेत. कॉमिक्स हे माध्यम निवडण्यामागे कथांवर आधारित माहिती प्रसाराचा दृष्टिकोन आहे. या माध्यमातून माहिती सर्व वयोगटांतील आणि विविध भागांतील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. सुप्रिया या तरुण जीवन विमा सल्लागाराचा प्रवास या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. तिच्या अनुभवांमधून वास्तव जीवनातील प्रसंग कथांच्या स्वरूपात मांडले आहेत. आयुष्यात आधी घेतलेले निर्णय भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेवर कसा परिणाम करतात, हे या कथांमधून स्पष्ट केले आहे. केवळ विम्याच्या विविध प्रकारांची माहिती देण्यापेक्षा नागरिकांना सुजाण ग्राहक बनवण्याच्या दिशेने हा उपक्रम हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ या व्यापक उद्दिष्टालाही बळ मिळते.
राष्ट्रीय विमा जागृती दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम आयआरडीएआय आणि जीवन विमा उद्योगाच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक आहे. ग्राहकांनी माहितीपूर्ण निर्णय घ्यावेत, जीवन संरक्षण उपायांविषयीची त्यांची समज वाढावी आणि भारतीय कुटुंबांमध्ये आर्थिक तयारी अधिक मजबूत व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
कॉमिक बुक मालिकेचे अनावरण करताना आयएसी-लाईफचे अध्यक्ष श्री. कमलेश राव म्हणाले, "भारताची प्रगती ही देशातील नागरिकांच्या आकांक्षा, प्रगतीची जिद्द आणि चिकाटी यांवर उभी आहे. देश अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. अशा वेळी कुटुंबांची आर्थिक तयारी मजबूत करणे ही दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याची महत्त्वाची पायाभरणी ठरेल. ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ ही संकल्पना परिवर्तन घडविणारी आहे. विमा काढण्याऱ्यांची संख्या वाढविण्यापुरती ती मर्यादित नाही. प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात आर्थिक संरक्षण हा अविभाज्य भाग बनविणे हे तिचे ध्येय आहे.
या प्रवासात जीवन विमा महत्त्वाची भूमिका बजावतो. तो आर्थिक आत्मविश्वास देतो. आकांक्षांना बळ देतो. आर्थिकदृष्ट्या कुटुंबांचा पाया मजबूत करतो. आयआरडीएआयच्या अध्यक्षांच्या हस्ते सादर करण्यात आलेली ग्राहक जनजागृती कॉमिक बुक मालिका या उद्दिष्टाला गती देणारे महत्त्वाचे पाऊल आहे. आर्थिक संरक्षणाचे महत्त्व सहज पण प्रभावी अशा पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ही मालिका करेल. संपूर्ण परिसंस्थेच्या सामूहिक प्रयत्नांतून भारत आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम भविष्यात वाटचाल करेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक कुटुंब आपल्या आकांक्षांचे संरक्षण करू शकेल. देशाच्या विकासात आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकेल."
श्री. राव यांनी गेल्या वर्षभरातील आयएसी-लाईफच्या विविध उपक्रमांचाही आढावा घेतला. 'सबसे पहले लाईफ इन्शुरन्स' मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रगतीची माहिती दिली. पुढील काही वर्षांत विमा जागृती आणि ग्राहक सहभाग अधिक बळकट करण्यासाठी समितीचा प्राधान्यक्रमही त्यांनी स्पष्ट केली.
लाईफ इन्शुरन्स कौन्सिलचे महासचिव श्री. आदित्य गुप्ता याप्रसंगी म्हणाले, "जीवन विमा म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबांना आयुष्यातील अनिश्चित परिस्थितींसाठी तयार ठेवणारे आश्वासन आहे. त्यामुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न ते आत्मविश्वासाने करू शकतात. विमा उद्योगाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. आता पुढील टप्प्यात विम्याबाबतची चर्चा अधिक सोपी, अधिक जवळची आणि देशभरातील ग्राहकांसाठी अधिक सुलभ करण्यावर भर असेल. ग्राहक जागृती कॉमिक बुक मालिका ही कथाकथनाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचा अभिनव प्रयत्न आहे. जीवन विम्याचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास ती मदत करेल. आयआरडीएआय, विमा क्षेत्रातील मान्यवर आणि लाईफ इन्शुरन्स कौन्सिल ग्राहक जागरूकता वाढविण्यासाठी कटिबद्ध आहेत. आर्थिक नियोजनाचा आवश्यक भाग म्हणून जीवन विम्यावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठीही आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू."
गेल्या काही वर्षांत विम्याचा विस्तार आणि जागृतीमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. तरीही अनेक भारतीय कुटुंबे अनपेक्षित जीवनातील घटनांसमोर आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आहेत. विम्याचा स्वीकार वाढवून हे वास्तविक आर्थिक संरक्षणातील अंतर कमी करणे आवश्यक असल्याचे उद्योगातील मान्यवरांनी यावेळी नमूद केले. दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या कार्यक्रमात ‘इंडिया आस्क्स (Asks) : व्हाय प्रायोरिटाइज लाईफ इन्शुरन्स?’ या विषयावर विशेष परिसंवादही आयोजित करण्यात आला. यात आयएसीचे अध्यक्ष कमलेश राव, एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दोराईस्वामी, पीएनबी मेटलाईफचे एमडी आणि सीईओ समीर बन्सल, इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ रुशभ गांधी सहभागी झाले. मुक्त आर्थिक पत्रकार सोनिया शेनॉय यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले. आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात जीवन विम्याची भूमिका, जनजागृती वाढविण्याचे महत्त्व आणि संरक्षणात्मक उपायांचा अधिक व्यापक स्वीकार या विषयांवर या चर्चेत सखोल विचारमंथन झाले.
नियामक संस्थेसह आयएसी-लाईफचे संरक्षण अजेंड्याला समर्थन
राष्ट्रीय विमा जनजागृती दिन यंदा भारतातील जीवन विमा क्षेत्राच्या सातत्यपूर्ण प्रगतीच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात आला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नव्या व्यवसायातील प्रीमियममध्ये (NBP) वर्षभरात १५.७ टक्के वाढ झाली. या कालावधीत २.८३ कोटींहून अधिक पॉलिसी जारी करण्यात आल्या. जीवन विमा उपाययोजनांबाबत ग्राहकांचा वाढता सहभाग यातून दिसून येतो. वाढ मजबूत असली तरी विमा स्वीकारण्याचा वेग विमा उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या तुलनेत कमी असल्याचे उद्योगातील नेत्यांनी मान्य केले. जनजागृती, विश्वास निर्माण करणे आणि आर्थिक साक्षरता यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय कुटुंबापर्यंत विमा संरक्षण पोहोचविण्यासाठी हे अत्यावश्यक ठरेल.


Comments
Post a Comment