झी मराठीवर अनोखी प्रेमकथा 'मन झालं बाजिंद'
आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.
मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे.
पिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीक. हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे.
या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे.
Comments
Post a Comment