मी स्वतःला भाग्यवान समजतो कि मला सर्व दिग्गजांकडून कुस्तीचे धडे मिळाले - विराट मडके

महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ म्हणजे कुस्ती आणि अशाच एका कुस्तीपटूची कथा सांगणारा सुपरहिट चित्रपट केसरी ३१ मे रोजी झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच निमित्ताने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विराट मडके याच्यासोबत साधलेला हा खास संवाद  
  1. केसरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाल्या?
  • मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. माझं एम.बी.ए. पूर्ण झाल्यानंतर माझं वजन थोडं वाढलं होतं. त्यामुळे जे लोकं मला आधीपासून ओळखतात त्यांना या ट्रेलरमध्ये मला इतकं फिट पाहून एक सुखद धक्काच मिळाला. तसेच चित्रपटाचा ट्रेलर सगळ्यांना आवडला, म्युजिक सगळ्यांना आवडलं या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या. बऱ्याच पेहेलवान लोकांच्या संपर्कात मी आहे, त्यांना देखील चित्रपटाचा ट्रेलर भावला. मला ज्या दिग्दर्शकांसोबत भविष्यात काम करायची इच्छा आहे त्यांचे देखील मला कॉल आणि मेसेजेस आले त्यामुळे मला खूपच जास्त आनंद झाला. आता हा चित्रपट झी टॉकीजवरून सगळ्यांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे मला अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  
  1. कुस्तीपटूंवर आधारित या चित्रपटासाठी तुम्हाला शारीरिक तसच मानसिक तयारी देखील महत्वाची होती, हा चित्रपट स्वीकारण्यामागे तुमची भावना काय होती?
  • अशी संधी मला आयुष्यात पहिल्यांदा मिळाली आणि या संधीच मला सोन करायचं होतं. मला हि संधी देणारे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांचा मी ऋणी आहे. माझ्यासाठी हि संधी खूप स्वप्नवत होती. मी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षांपासूनच कुठल्या ना कुठल्या स्पोर्टमध्ये सक्रिय आहे. मी महाराष्ट्रासाठी फुटबॉल खेळलोय, शाळा कॉलेजमध्ये असताना मी क्रिकेट, बॅडमिंटन खेळायचो, मी स्वीमिंग करतो, एन.सी.सी. चा एक भाग होतो तसेच बरेच कॅम्पसमध्ये मी सहभाग घ्यायचो. त्यामुळे मी बरेच स्पोर्ट्स याआधी खेळलो आहे आणि स्पोर्ट्समनशिप काय असते किंवा तो स्पोर्ट्समन कसा घडतो, त्याची जर्नी जी असते ती मी अनुभवली आहे. त्यामुळे मी त्या व्यक्तिरेखेसोबत रिलेट करू शकलो. तसेच मी मूळचा कोल्हापूरचा आहे आणि आमचा गावी एक आखाडा आहे, माझ्या परिवारातील अनेक जण पहेलवान आहेत आणि त्यांनी खूप कुस्त्या गाजवल्या आहेत पण माझा कुस्तीशी तसा कधी संबंध आला नाही. त्यामुळे हा रोल जेव्हा मला ऑफर झाला तेव्हा मला हेच वाटलं कि हि माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे खूप काही शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची.      
  1. कुस्तीपटूची भूमिका साकारण्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
  • कुस्तीसाठी खूप शारीरिक तयारी लागते. पहिली २ वर्ष मी फक्त शारीरिक स्ट्रेंथवर भर दिला. मी रोज १० किलोमीटर धावायचो, संध्याकाळी २ तास जिम मध्ये व्यायाम करायचो. या प्रवासात मी माझ्या डाएटकडे देखील खूप लक्ष दिलं. यातील पहिले ६ महिने मला खूप त्रास झाला पण त्यांनंतर मला याची सवय झाली. त्यानंतर मी तालमीत कुस्तीचा सराव केला. तिकडच्या सर्व मल्ल आणि खेळाडू यांनी मला खूप मदत केली. मी तिथल्या खऱ्या पेहेलवानांसोबत कुस्तीचा सराव केला. मी स्वतःला भाग्यवान समजतो कि मला सर्व दिग्गजांकडून कुस्तीचे धडे मिळाले.  
  1. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा अविस्मरणीय किस्सा?
  • असे खूप किस्से आहेत पण त्यातला अविस्मरणीय किस्सा सांगायचं म्हणजे पहिल्याच दिवशी आमचं शूटींग ज्योतिबाला होतं. त्यादिवशी गुरुपौर्णिमा होती आणि सकाळी ५ वाजता आम्ही त्या लोकेशनवर हजर होतो. सगळीकडे धुकं आणि पूर्वेला सूर्य उगवतोय आणि दुसरीकडे आकाशात चंद्र दिसतोय अशा वातावरणात ज्योतिबाच्या कळसावर माझ्या ट्रेनरने मला व्यायाम करायला लावलं. लोकांच्या गर्दीमधून मी चालत येतोय असा सिन होता जो मी कधीच विसरू शकत नाही. तसेच एक खाऱ्या नदीतून पोहण्याचा सिन होता त्यासाठी मी खरच पोहून मी ती नदी पार केली तेव्हा तिकडचे स्थानिक लोकं आम्हाला म्हणाले कि तुम्ही या नदीतून कसे आलात या नदीत संध्याकाळी मगरी येतात. त्यानंतर आम्ही थोडं घाबरलो पण आमचं तिकडंच शूटिंग खूप चांगलं झालं याच आम्हाला समाधान होतं.
  1. ऑफ-स्क्रीन सहकलाकारांसोबतचा एखादा किस्सा
  • एकदा मी माझ्या सहकलाकारांसोबत एका लोकेशनवर उभं राहून सहज गप्पा मारत होतो आणि सुजयने ते सगळं पाहिलं आणि त्याने त्याच सीनमध्ये रूपांतर केलं. तसेच एका सीनच्या चित्रिकरणासाठी माझ्या सहकलाकाराने माझ्यासाठी चहा घेऊन यायचा प्रसंग होता पण तो चहाचा कप न घेताच बाहेर आला आणि हे कोणाच्या लक्षातच नाही आलं आणि तो सिन तसाच शूट होतं राहिला. असे अनेक विनोदी किस्से शूटिंगच्या दरम्यान घडले.  
  1. झी टॉकीज वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर होणार आहे, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल?
  • मी झी टॉकीजचा मनापासून आभारी आहे कि आमचा हा चित्रपट टॉकीज आपल्या वाहिनीवरून हा चित्रपट प्रसारित करणार आहे. तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षक या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकतील. केसरी या चित्रपटाची कथा खूप साधी सरळ आहे. पण साध्या गोष्टी पडद्यावर उत्तमरीत्या साकारणं आव्हानात्मक आहे. तसंच साध्या गोष्टींची आयुष्यात देखभाल करणंच खूप कठीण असतं. याचा संदर्भ द्यायचा म्हणजे कोरोनामुळे आपण १ वर्ष घरी आहोत आणि आपल्याला हि गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे कि आपल्याला जगण्यासाठी बेसिक गोष्टींची गरज आहे.  आपली प्रकृती, चांगले विचार आणि सकस आहार या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बाहेरच खाणं किंवा स्टिरॉइड्स घेणाऱ्यांपेक्षा सकस आहार घेणाऱ्या माणसाची प्रकृती नक्कीच चांगली राहणार आहे. या चित्रपटात माझी व्यक्तिरेखा साकारताना देखील मी या सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. बेसिक गोष्टींना धरून आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. हा चित्रपट प्रेक्षकांना या बेसिक्सची आठवण करून देईल. त्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनी बघावा असं मी प्रेक्षकांना आवाहन करतो कारण त्यातून मनोरंजनासोबत या कठीण काळात प्रोत्साहन आणि मनोबल देखील मिळेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight