ही थरारक मालिका करतांना मला खूप समाधान मिळते, मला वैयक्तिकरित्या रहस्यमय गोष्टी आवडतात: सागर देशमुख
१. चंद्रविलास ह्या मालिकेबद्दल काय सांगशील ?
‘चंद्रविलास’ ही एक रहस्यमयी कथानक असलेली मालिका आहे. झी मराठी खूप दिवसांनी थरारक मालिका करत आहे. मला स्वतःला रहस्यमय गोष्टी आवडतात, त्यामुळेच मला या मालिकेत काम करतांना एक वेगळाच अनुभव येतो.
२. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर अनंत महाजन हे पात्र मी साकारत आहे. हा मुंबई मध्ये राहणारा एक आर्किटेक्ट आहे, अत्यंत विद्वान व नास्तिक स्वभावाचा माणूस असून त्याचा देवांवरती आणि भुतांवरती विश्वास नाही. त्याच त्याच्या मुलीवरती अत्यंत प्रेम आहे. कारण काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी काही कारणास्तव त्याला सोडून गेली होती, थोडक्यात तिचे निधन झाले आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतरची पोकळी भरून काढण्यासाठी तो आपल्या मुलीबद्दल अधिक काळजी घेत आहे. काही काळाने त्याला चंद्रविलास या वाड्यावर याव लागत आणि तिथे ते दोघही बाप आणि लेक अडकून पडतात. मी मुळात या मालिकेत एक संरक्षक पिता असून प्रेक्षक मला अशा प्रकारच्या व्यक्तिरेखेत पहिल्यांदाच पाहत आहेत. अमोल पाठारे आणि राजेश वराडे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत, ते खूप चांगले आहेत. आणि म्हणून हे माझ्यासाठी एक अद्वितीय पात्र आहे आणि ही भूमिका साकारत असताना मला खूप आनंद होतो.
३. तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?
आभा बोडस माझ्या मुलीच पात्र साकारत आहे ती खरोखर खूप हुशार आणि ध्येयवादी मुलगी आहे. आमची केमिस्ट्री वडील आणि मुलगी जोडी खूप चांगली आहे तसेच आम्हाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. काही वेळा प्रेक्षकांना वाटते कि ही वास्तविक जीवनातील वडील मुलगी जोडी आहे कि काय. मग वैभव मांगले हे एक ज्येष्ठ अभिनेता असून मी यापूर्वी देखील त्याच्यासोबत काम केलय. शिवाय ते माझे चांगले मित्र आहेत . आम्ही समजूतदारपणे एकत्र काम करतो. भक्ती देसाई जी एका नर्सची भूमिका साकारत आहे, मी तिच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहे. पूजा ठोंबरे या सर्व मुली खूप हुशार आणि मेहनती आहेत व आम्ही आमच्या कामाप्रति समर्पित आहोत. तर खूब छान अश्या वातावरणात आम्ही आहोत.
४. तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगा / आता पर्यंतचा प्रवास ?
मी आता जवळ जवळ तेवीस वर्षांपासून या सिनेसृष्टीत काम करत आहे. मी मुख्यतः नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. आता सध्या मला हि एक गूढ संकल्पना असलेली चंद्रविलास या मालिकेत काम करायची संधी भेटली आहे. खरा सांगायचं तर माझं मन जर कुठे रमत असेल तर तो नाटकातच जास्ती रमते.
तेव्हा पाहायला विसरू नका एक रहस्यमय भयकथा "चंद्रविलास" सोमवार ते शनिवार रात्री ११ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Comments
Post a Comment