'नाफा' तर्फे अमेरिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार

'नाफा' तर्फे अमेरिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार  

सध्या मराठी चित्रसृष्टीत चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ‘नाफा’च्या चित्रपट महोत्सवाची… अर्थात ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ आयोजित फिल्म फेस्टिव्हलची! चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी अमेरिकेच्या भूमीत मराठी चित्रपट रूजवण्याचं स्वप्नं बघितलं आणि ते सत्यात उतरवूनही दाखवलं. अमेरिकेत सातासमुद्रापार मराठी चित्रपटांना एक अनोखं स्थान देत घोलप यांनी मराठी चित्रपटसृष्टीची पताका रोवाली. दिमाखात सुरू असलेल्या या चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने दिग्गज कलाकारांची मांदियाळीच अमेरिकेत अवतरली आहे.

'नाफा'च्या या चित्रपट महोत्सवला दिग्गजांनी हजेरी लावली. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात हा चित्रपट महोत्सव पार पडला. तसेच सुप्रिया व सचिन पिळगांवकर यांनी सिनेरसिकांशी संवाद साधला. तर दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी मास्टरक्लास घेतले. यासोबतच निवेदिता सराफ, अश्विनी भावे, महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, प्रसाद ओक, मेधा मांजरेकर आदी दिग्गज कलाकार या महोत्सवाला सातासमुद्रापार हजर राहिले. या सर्व दिग्गज कलाकारांनी आपलं कलेतील योगदान अमेरिकेतील भारतीयांसमोर मांडलं.

या महोत्सवाची आणखी एक खासियत म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना नाफा आणि अभिजीत घोलप यांच्याकडून ‘जीवन गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. चिमणराव गुंड्याभाऊ, चौकट राजा, अलबत्या गलबत्या मधील चेटकीण, फास्टर फेणेमधील भा. रा., देऊळ मधील मास्तर, बोक्या सातबंडेचे प्रणेते आणि नाटकं गाजवणारे नाट्याकलाकार अशा दिलीप प्रभावळकर यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ या चित्रपटाचे निर्माते आणि उद्योजक अभिजीत घोलप यांना अमेरिकेतील भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठी सिनेरसिकांसाठी अमेरिकेच्या मातीत मराठी सिनेमा आणि सिनेमासंस्कृती रूजवायची होती. याची सुरूवात त्यांनी काही मराठी चित्रपटांची निर्मिती थेट अमेरिकेत करत केली. अमेरिकेतीलच निर्मितीमूल्ये असलेले 'पायरव' आणि ‘निर्माल्य’ या दोन शॉर्टफिल्म्स या महोत्सवात पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आल्या.

‘कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये रंगलेला हा महोत्सव मराठी कलाप्रेमींना एक वेगळा दृष्टीकोन देऊन गेला. तसेच मराठी मातीपासून आपण दूर नाही, तर अमेरिकेतही आपली नाळ मराठी सिनेजगताशी बांधली गेली आहे, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट महोत्सव होता‌ आणि त्याला सिनेरसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight