केवळ सोहळा नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारा लग्नसमारंभ
केवळ सोहळा नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारा लग्नसमारंभ
जीत अदानी आणि दिवा शाह 7 फेब्रुवारी 2025 रोजी विवाहबद्ध होत आहेत आणि हा सोहळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. हा एक भव्यदिव्य, सेलिब्रिटींची मांदियाळी असलेला सोहळा असेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, गौतम अदानी यांनी सांगितले की, हा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि कुटुंबीय व निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडेल. या लग्नाला वेगळेपण देणारी गोष्ट म्हणजे त्यामागचा सामाजिक दृष्टिकोन – सर्वसमावेशकतेचा स्वीकार आणि समाजासाठी काहीतरी परत देण्याची बांधिलकी.
जीत अदानी हे दिव्यांगांच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करणारे एक संवेदनशील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विवाहसोहळ्यातही हा सामाजिक बांधिलकीचा महत्त्वाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. त्यांच्या दृष्टीने हा विवाह केवळ प्रेमाचे बंधन नसून, दिव्यांगांच्या अपार क्षमतेची जाणीव करून देण्याची संधी आहे. त्यांच्या या विचारसरणीमुळे लग्नसमारंभ साजरे करण्यासाठी एक नवा पायंडा पडेल. हा समारंभ म्हणजे केवळ वैयक्तिक आनंदाचा उत्सव न राहता समाजाचे हित जपण्याचाही प्रयत्न करण्यात येतो.
अदानी कुटुंबीयांतर्फे समाजसेवेला कायमच महत्त्व देण्यात येते. अदानी फाउंडेशनच्या ग्रीनएक्स टॉक्स उपक्रमातून हीच भावना प्रतिबिंबित होते. या उपक्रमांतर्गत, केवळ नफ्यावर भर न देता समाजातील सकारात्मक परिणामाला प्राधान्य देण्यासाठी चेंजमेकर्सना (बदलकर्ते) प्रोत्साहन देण्यात येते. ग्रीनएक्सच्या माध्यमातून फाउंडेशनतर्फे संयुक्त राष्ट्रांच्या 17 शाश्वत विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यात येत आहे आणि देशभरातील 9 मिलियनहून अधिक लोकांच्या जीवनावर, विशेषतः वंचित समुदायांमध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींचा समावेश हा महत्त्वाचा भाग असून, अदानी समूहात सध्या 30 हून अधिक दिव्यांग कर्मचारी सक्षमपणे कार्यरत आहेत. यामुळे केवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत, तर विविधतेतून प्रगती कशी साधता येते, याचा आदर्शही समाजासमोर ठेवला जातो.
जीत अदानी यांचे सामाजिक कार्य फक्त अदानी फाउंडेशनपुरते मर्यादित नाही. वंचित समुदायांना सक्षम करण्याच्या आपल्या ध्येयाबद्दल शार्क टँक या कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट केले की, दिव्यांगत्व ही कोणाचीही ओळख असू शकत नाही. मिट्टी कॅफे आणि फॅमिली फॉर डिसेबल्ड यांसारख्या स्वयंसेवी संस्थांबरोबरच्या सहकार्याद्वारे ते रोजगाराला सन्मान आणि सशक्तीकरणाचे साधन म्हणून प्रोत्साहन देत आहेत. त्यांचे हे कार्य अदानी समूहाच्या धोरणाशी सुसंगत आहे. अदानी समूहात एकूण कर्मचाऱ्यांपैकी किमान 5 टक्के अपंग व्यक्ती असाव्यात, यावर भर दिला जातो.
जीत अदानी यांची सामाजिक बदलांप्रती असलेली वैयक्तिक बांधिलकी मिट्टी कॅफेच्या भेटीदरम्यान आणखी स्पष्ट झाली. ही संस्था दिव्यांगांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थापक अलीना यांच्या प्रेरणादायी कार्याने प्रभावित होऊन, त्यांनी मुंबई विमानतळावर मिट्टी कॅफे स्थापन करण्यास मदत केली. या भेटीमुळे समावेशक रोजगाराला चालना देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अधिक बळ मिळाले आणि अदानी समूहात अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना संधी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील राहतील, हे अधोरेखित झाले.
याशिवाय, नामांकित फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि एफओडी यांच्यातील सहकार्याने उत्तम फॅशन आणि सामाजिक उद्दिष्टे यांची सांगड घालण्यात आली आहे. मनीष मल्होत्रा यांनी जीत आणि दिवाच्या विवाहासाठी खास शाली डिझाइन केल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून हस्तकलेला सामाजिक उद्दिष्टांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असून, दिव्यांगांच्या प्रतिभेला जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याचा हेतू आहे.
या विवाहसोहळ्यात भारतभरातील कुशल कारागीर आणि त्यांच्या हस्तकला पाहायला मिळणार आहेत. एफओडी आणि काई रासी या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारला जात आहे. या निमित्ताने निकिता आणि प्रकाश यांनी अत्यंत कलात्मक दागिने आणि नेल आर्ट तयार केली आहे, तर फिरोजाबादमधील काचकारागिरांनी नेत्रदीपक कलाकृती साकारल्या आहेत. हे सर्व कारागीर दिव्यांग असून, त्यांच्या कौशल्याची आणि कलेची या विवाहसोहळ्यात विशेष दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ आनंदाचा नव्हे, तर समाजातील सर्वसमावेशक सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
विवाहपूर्व सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला 'मंगल सेवा' असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून दरवर्षी 500 नवविवाहित दिव्यांग महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे, जेणेकरून त्या आत्मसन्मानाने आणि आत्मविश्वासाने वैवाहिक जीवनाची सुरुवात करू शकतील. या उपक्रमांतर्गत दर वर्षी प्रत्येक लाभार्थीला रु.10 लाख देण्यात येतील. त्यांच्या नव्या आयुष्याची मजबूत सुरुवात करण्यास त्यांना या रकमेची मदत होईल. जीत अदानी यांनी वैयक्तिकरित्या 25 नवविवाहित दिव्यांग महिलांना आणि त्यांच्या पतींना भेटून त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले. समाजातील सर्वसमावेशकता वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे हे द्योतक आहे. जीत अदानी यांचे वडील गौतम अदानी यांनी मंगल सेवा उपक्रमाविषयी अभिमान व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, हा उपक्रम जगाला अधिक सर्वसमावेशक बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग महिलांच्या आयुष्यात आनंद आणि सन्मान कायमस्वरूपी वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा केवळ एक विवाहसोहळा नसून, प्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम आहे. अदानी कुटुंबीयांनी स्वयंसेवी संस्थांशी आणि कारागिरांशी हातमिळवणी करून असा एक सोहळा साकारला आहे, ज्यात दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण होणार आहे आणि स्थानिक हस्तकलेचा गौरव करण्यात येणार आहे.
या सर्वसमावेशकतेमुळे पारंपरिक विवाहसंस्कारांला एका सामाजिक उद्देशाची जोड मिळाली आहे. या कुटुंबातर्फे ज्या मूल्यांना विशेष महत्त्व देण्यात येते, त्यांचा दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थपूर्ण उत्सव हे केवळ आनंदासाठी नसतात, तर ते समाजावर सकारात्मक प्रभाव टाकतात आणि एका मोठ्या सामाजिक हेतूला पाठिंबा देतात, हे त्यांच्या विचारसरणीतून दिसून येते.
Comments
Post a Comment