झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळ्यात घुमणार कुर्रर्र….
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळ्यात घुमणार कुर्रर्र….
मातृत्वाच्या संवेदनशील विषयाला प्रसाद खांडेकरचा विनोदी तडकाआईपण हे महान आहेच, पण हे सुख अनुभवण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर तो प्रवासही त्या आई होणाऱ्या स्त्रीसाठी सुखद असायला हवा, हलकाफुलका असायला हवा. आई होण्याच्या याच संवेदनशील भावनेला विनोदाच्या गोडव्यातून सादर करणारं नाटक गेल्या वर्षी रंगमंचावर आलं आहे ज्याचं नाव आहे कुर्रर्र. विनोदाची भट्टी असलेल्या प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे या चौकडीने कुर्रर्र नाटक भन्नाट बनवलं आहे. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळ्यात कुर्रर्र आवाज , घुमल्याशिवाय राहणार नाही. झी टॉकीज कॉमेडी ॲवार्ड सोहळा ९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
कुर्रर्रर्र हा शब्द माणसाच्या कानात त्याला आयुष्यात एकदाच ऐकायला मिळतो. आई या शब्दा शिवाय दुसऱ्या कुणीतरी बाळाच्या कानात म्हटला जाणारा हा पहिला शब्द. बाळासाठी आणि त्याच्या आईसाठी कुर्रर्र हा शब्द घुमतो तो पाळण्यात. जन्मानंतर बाराव्या दिवशी. जिला आई व्हायची इच्छा आहे तिच्यासाठी तर हा शब्द लग्न झाल्यापासूनच मनात रूंजी घालत असतो. आजही लग्नानंतर मातृत्वाची चाहूल कधी लागतेय हा प्रश्न परवलीचा बनलेला असतो. ज्या महिला आई होऊ शकत नाहीत, किंवा त्यांच्या आई होण्यात काही अडथळे येत असतील त्यांना आजही समाजाकडूनच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही टोमणे ऐकून घ्यावे लागतात. याच संवेदनशील विषयावर कुर्रर्र नाटक हलकंफुलकं भाष्य करतं.
झी टॉकीज कॉमेडी ॲवार्डच्या नामांकनांमध्ये कुर्रर्र नाटकाचा समावेश आहे. प्रग्यास क्रिएशन आणि व्ही. आर. प्रॉडक्शन या नाट्यसंस्थांनी कुर्रर्र नाटकाची निर्मिती केली आहे. अभिनेता लेखक प्रसाद खांडेकर याने हे नाटक दिग्दर्शित केलं आहे. सर्वोत्कृष्ट नाटक या विभागामध्ये कुर्रर्र नाटकाला नामांकन मिळालं आहे.
कुर्रर्र नाटकाच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने गेल्या दोन वर्षातील आठवणी शेअर केल्या. "जसा बाळाचा जन्म हा नऊ महिन्यांचा प्रवास असतो, ती एक अनुभूती असते. बाळ अजून पोटातच असलं तरी ते आपल्या सोबत आहे अशी जाणीव होत असते. अगदी तसच कुर्रर्र या नाटकाचा विषय माझ्या डोक्यात घोळत असल्यापासून ते रंगमंचावर येईपर्यंत मी या नाटकाची बाळासारखी वाट बघत होतो" असं प्रसादने त्याच्या कुर्रर्र नाटकाचं आणि त्याचं नातं सांगितलं. प्रसाद म्हणाला, "खरंतर हा विषय बऱ्याच वर्षापासून माझ्या डोक्यात घोंगावत होता. लग्नानंतर किती दिवसात एखादं जोडपं गोड बातमी देतं यावर त्यांच्या वैवाहिक नात्याची खुशाली अवलंबून असते हे समाजातील एक चित्र आहे. त्यांना थोडा वेळ द्यावा, किंबहुना बाळ कधी जन्माला घालायचं हा निर्णय सर्वस्वी त्या दोघांचाच असायला हवा इतकं स्वातंत्र्य खूप कमी कुटुंबातील जोडप्यांना मिळतं. यावर काही विनोदाची पेरणी करून हलके चिमटे काढता येतील का हा विचार होता. विचार कृतीत येण्यासाठी लॉकडाऊनचा काळ मिळाला. कोरोनाकाळात घरी निवांत असताना या नाटकाने माझ्या डोक्यातून संहितेच्या, संवादाच्या रूपाने आकार घेतला. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर आलं ते विशाखा सुभेदार हिने निर्मितीची धुरा घेतल्यामुळेच."
प्रसाद, नम्रता, विशाखा आणि पॅडी यांची भट्टी जमलेलीच होती. प्रसादच्या डोक्यात कलाकारही ठरले होतेच. १५ दिवसांच्या तालमीअंती हे नाटक रंगमंचावर येण्यासाठी तयार होतं इतकी या चौघांची केमिस्ट्री जुळलेली आहे. प्रसादच्या शब्दातच सांगायचं तर विनोद जितका हसवणारा हवा, निखळपणे मनोरंजन करणारा हवा तितकाच तो शेवटच्या क्षणी टचकन डोळे पाणावणारा, अंतर्मुख करणाराही हवा. आई होणं या सारखा संवेदनशील विषय विनोदातून मांडताना दिग्दर्शक, लेखक म्हणून हे आव्हान पेलायचं होतं. आईपणाच्या सात्विकतेला कुठेही चुकीचं रूप येणार नाही याचीही काळजी घ्यायची होती.
सासूसासरे, लेक जावई, आई मुलगी, बापलेक, जावई आणि सासूसासरे अशा अनेक नात्याचे पदर कुर्रर्र नाटकात उलगडतात. प्रसाद आणि नम्रता ही लग्नाला पाच वर्ष झालेली जोडी आहे. नम्रताची आई विशाखाचा नवरा तिला २५ वर्षापूर्वी सोडून गेल्याने ती मुलीकडेच राहतेय. आईला वाटतय की आता मुलीने लवकर आई होण्याचा विचार करावा. तर लेक आणि जावई यांना वाटतय की काय घाई आहे, होईल व्हायचं तेव्हा. थोडक्यात काय तर पाळण्यात कुर्रर्र कधी घुमावं याची घरात चर्चा आहे. अशातच मुलीचे वडील परत येतात. त्यानंतर काय गोंधळ होतो, कुर्रर्र करण्याची वेळ येते का, नम्रताची आई होण्याची तळमळ पूर्ण होते का, तिच्या आईची इच्छा पूर्ण होते का असे अनेक धागेदोरे विनोदाची सुई गुंफते, कधी हळूवार तर कधी समाजव्यवस्थेला टोचणी देत. सर्वोत्कृष्ट नाटक या विभागात नामांकन मिळालेल्या कुर्रर्र या नाटकाला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड मिळणार का? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तेव्हा नक्की पहा झी टॉकिज कॉमेडी अवॉर्ड सोहळा ९ ऑक्टोबर ला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता फ़क्त आपल्या झी टॉकीज वाहिनी वर
Comments
Post a Comment