१६ वर्षांनंतर पुन्हा ‘सारेगमप’च्या मंचावर वैशाली सामंत

 १६ वर्षांनंतर पुन्हा ‘सारेगमप’च्या मंचावर वैशाली सामंत

नव्या पिढीच्या गायकांना ऐकण्यासाठी उत्सुक; नव्या पिढीच्या संगीताचा दृष्टिकोन व्यक्त केला

 

वैशाली सामंत यांचा आवाज आणि त्यांचा संगीतप्रवास मराठी रसिकांसाठी परिचित आणि आपलासा आहे. आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत अनेक नवोदित गायकांना जवळून पाहिलेल्या आणि त्यांच्या प्रवासाला दिशा देणाऱ्या वैशाली सामंत आता पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतानाच, जागतिक संगीत ऐकणाऱ्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची जिद्द असलेल्या नव्या पिढीतील गायकांना ऐकण्यासाठी वैशाली सामंत यांनी विशेष उत्सुकता व्यक्त केली. “‘सारेगमप’च्या यंदाच्या पर्वाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे यंदाचा स्पर्धकांचा वयोगट. या पिढीतील गायकांमध्ये असलेली संगीताची जाण आणि विविध प्रकारचं जागतिक संगीत ऐकण्याची सवय यामुळे त्यांच्याकडून काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, असा विश्वास वैशाली सामंत यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘सारेगमप’चं यंदाचं विशेष म्हणजे यावेळचा स्पर्धकांचा वयोगट. या वयोगटातील जे गायक आपण ऐकणार आहोत, ते खूप आशादायक आहेत. माझ्यासाठी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तब्बल १६ वर्षांनंतर मी आणि अवधूत दोघेही पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर परीक्षक म्हणून येत आहोत. ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे आणि या निमित्ताने अनेक जुन्या आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.”

 

संगीताची बदलती वाटचाल, सोशल मीडियाच्या युगात नवोदित कलाकारांना मिळणाऱ्या संधी आणि ‘सारेगमप’ सारख्या व्यासपीठाचं महत्त्व याबाबतही वैशाली सामंत यांनी आपला दृष्टिकोन व्यक्त केला. त्यांच्या मते, संगीत हा अथांग समुद्र असून त्यात जितकं खोलवर जावं, तितकं नवं काहीतरी शिकायला मिळतं. या पर्वातून प्रेक्षकांनी आणि संगीताची आवड असलेल्या तरुणांनी काय प्रेरणा घ्यावी, असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “प्रेक्षकच आम्हाला प्रेरणा देत असतात. गाणं हा एक समुद्र आहे. त्यात जितकं खोल जाल, तितकी अजून खोली दिसत जाते. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने गाणं खुलवण्याचा, फुलवण्याचा प्रयत्न करायचा असतो. ‘सारेगमप’सारख्या मंचाकडून जर कोणाला प्रेरणा मिळाली, तर ते ‘सारेगमप’च्या मंचाचं यश असेल, असं मला वाटतं.” पुढे त्या म्हणाल्या, “स्पर्धकांचं चांगलं करिअर घडणं आणि त्यांना एका चांगल्या करिअरच्या वळणावर नेऊन ठेवणं, हा अशा सांगीतिक स्पर्धांचा मूळ उद्देश असायला हवा. आणि ‘सारेगमप’चा तोच उद्देश आहे, असं मला वाटतं.”

 

नव्या स्पर्धकांच्या स्वप्नांना दिशा देण्याची जबाबदारी आणि संगीताकडे पाहण्याचा प्रदीर्घ अनुभव यामुळे या पर्वात वैशाली सामंत यांची भूमिका निश्चितच विशेष ठरणार आहे. संगीताचे प्रवाह बदलले, पिढ्या बदलल्या आणि संगीत ऐकण्याच्या पद्धतीही बदलल्या, तरी सूर, रियाज आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची जिद्द हीच प्रत्येक गायकाच्या प्रवासाची खरी ओळख आहे. नव्या पिढीतील या आशादायी गायकांचा संगीतप्रवास जवळून अनुभवण्यासाठी वैशाली सामंत पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर सज्ज झाल्या आहेत.

 

तेव्हा पाहायला विसरू नका 'सा रे ग म प' २२ ऑगस्टपासून शनि - रवि रात्री ९.३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable