‘आदि अनंत’मधील रॅप साँग प्रदर्शित!

'आमच्या वेळी असं नव्हतं' म्हणत जनरेशन रँपचा तडका

"आदि अनंत" मधील रँप साँग प्रदर्शित!

‘आमच्यावेळी असं नव्हतं!’ हे वाक्य प्रत्येक घरात कधी ना कधी ऐकायला मिळतंच! आजच्या तरुणाईची बदललेली भाषा, त्यांची जीवनशैली, विचार करण्याची पद्धत आणि जुन्या पिढीची प्रत्येक गोष्टीकडे पाहाण्याची वेगळी नजर… या सगळ्यांतून निर्माण होणारी गंमत म्हणजेच जनरेशन गॅप! हाच विषय भन्नाट रॅपच्या माध्यमातून मांडत ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘आमच्यावेळी असं नव्हतं’ हे रॅप साँग सध्या लक्ष वेधून घेत आहे. भन्नाट शब्द, दमदार संगीत आणि रॅपचा जबरदस्त अंदाज यामुळे हे गाणं ऐकायला आणि पाहायलाही तितकंच रंजक ठरत आहे. विशेष म्हणजे, तरुणाईला भावणाऱ्या या गाण्यातून दोन पिढ्यांमधील विचारांची तफावत मनोरंजक पद्धतीने समोर येते.

आजच्या पिढीला जुन्या पिढीच्या सवयी कधी जुनाट वाटतात, तर तरुणांचे बदललेले विचार मोठ्यांना सहजासहजी पटत नाहीत. मोबाईलपासून कपड्यांपर्यंत, जगण्याच्या पद्धतीपासून विचार करण्याच्या दृष्टिकोनापर्यंत प्रत्येक गोष्टीत ही तफावत जाणवते. मात्र, याच मतभेदांमध्ये दडलेली गंमत आणि नात्यांमधील आपुलकी ‘आमच्यावेळी असं नव्हतं’ या रॅपमधून प्रभावीपणे व्यक्त होते. संकर्षण कऱ्हाडे आणि सुजय जाधव यांच्या शब्दांना विश्वजीत जोशीच्या आवाजातील ऊर्जा लाभली आहे. अविनाश-विश्वजीत यांच्या संगीतामुळे या रॅपला एक वेगळीच रंगत आली आहे. रॅपचा ठेका, शब्दांची मांडणी आणि त्यातून व्यक्त होणारा आशय यांची धमाल सांगड या गाण्यात अनुभवायला मिळते.

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “जनरेशन गॅप हा प्रत्येक घरात अनुभवायला मिळणारा विषय आहे. दोन पिढ्यांचे विचार वेगळे असले, तरी त्यांच्यातील नातं आणि प्रेम कायम असतं. ‘आमच्यावेळी असं नव्हतं’ या रॅपमधून हा विषय मनोरंजक पद्धतीने मांडला आहे. त्यातील गंमत प्रेक्षकांना नक्कीच भावेल.”

संकर्षण कऱ्हाडे सांगतात, “‘आमच्यावेळी असं नव्हतं’ हे वाक्य आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे. दोन पिढ्यांमधील विचारांची गंमत रॅपच्या माध्यमातून मांडताना शब्दांमधूनच एक वेगळी मजा निर्माण झाली. या गाण्यातील मिश्किलपणा आणि त्यामागचा आशय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

संगीतकार अविनाश-विश्वजीत म्हणतात, “रॅपचा ठेका आणि त्यातून व्यक्त होणारा जनरेशन गॅपचा विषय यांचा मेळ साधणं आमच्यासाठी खास होतं. या गाण्याला आजच्या तरुणाईला आवडेल अशी ऊर्जा आणि वेगळा संगीतानुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.”

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘आदि अनंत’ची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. तर रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्मिते आहेत. आजोबा आणि नातवाच्या नात्यातील गंमतीजंमती, दोन पिढ्यांमधील विचारांचा संघर्ष आणि त्यामागील भावनिक बंध या चित्रपटातून उलगडणार आहेत. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. 

येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable