‘सरसेनापती हंबीरराव’ यांचा १८ फुटी कटआऊट
पुण्यात उभारला ‘सरसेनापती हंबीरराव’ यांचा कटआऊट
सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातील हितचिंतक, चाहते आणि रसिक प्रेक्षक विविध प्रकारे शुभेच्छा देत आहेत.
पुण्यामध्ये माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक मा. दीपक माधवराव मानकर तसेच करण मानकर, दत्ताभाऊ सागरे आणि आनंद सागरे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ सरसेनापती हंबीरराव यांचा १८ फूट उंच कटआऊट उभा केला आहे. त्यानिमित्त या मान्यवरांनी खूप मोठा स्वागत सोहळा आयोजित केला होता.
खास काढलेली रांगोळी, सजावट आणि ढोलताश्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते सौजन्य निकम तसेच सूर्यकांत निकम, प्रताप निकम यांच्यासह पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी सरसेनापती हंबीरराव यांची प्रविण तरडे यांच्या रूपातील १८ फूटी छबी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती..'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा, प्रचंड ऊर्जा आणि चित्रपटाबद्दल उत्सुकता अशा भारावलेल्या वातावरणात पार पडलेल्या या नेत्रदीपक सोहळ्याचा समारोप उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून करण्यात आला.
संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.
Comments
Post a Comment