‘जग्गू आणि जुलिएट’ चा कलरफुल ट्रेलर रिलीज

जग्गू आणि जुलिएट' चा कलरफुल ट्रेलर रिलीज

- कोळीवाड्याच्या जग्गूची फॉरेनच्या चितळेसोबत धडाक्यात एन्ट्री

- अमेयचा जग्गू आणि वैदेहीची जुलिएट करणार उत्तराखंडात धमाल, ट्रेलर रिलीज

- ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ ची नवीकोरी निर्मिती

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची चर्चा त्याचं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासूनच झाली होती. त्यानंतर आलेल्या टीझरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर टाकली आणि आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. अमेय वाघ-वैदेही परशुरामीसह दिग्गज कलाकार मंडळी असलेल्या ‘जग्गू आणि जुलिएट’ चा हा नवाकोरा कलरफुल ट्रेलर बघून चित्रपटप्रेमी रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ही कलाकृती असेल अशी खात्री आहे. 

टीझरवरून आपल्याला कळलंच होतं की, अमेय हा कोळीवाड्यातल्या जगदीश उर्फ जग्गूच्या भूमिकेत आहे, तर वैदेही ही अमेरिकेतल्या चितळ्यांच्या जुलिएटच्या भन्नाट भूमिकेत आहे. या दोघांची लव्हस्टोरी हटके पद्धतीने या चित्रपटात सांगण्यात आली आहे. समाजातल्या दोन वेगवेगळ्या घटकांतून आलेल्या या जग्गू आणि जुलिएटची प्रेमकथा कशी असेल, त्यांच्या या प्रेमकथेत इतर पात्रांचा काय ‘रोल’ असेल आणि ही लव्हस्टोरी शेवटी कुठे येऊन पोहोचेल हे जाणून घेण्यासाठी १० फेब्रुवारीला थेट चित्रपटगृहात जाऊन ‘जग्गू आणि जुलिएट’ चा आस्वाद घ्यावा लागेल.

चित्रपटाच्या ट्रेलरवरून याचा अजून एक ‘प्लस पॉईंट’ असा दिसून येतोय की, या चित्रपटात रसिकांना नयनरम्य देवभूमी उत्तराखंडची सफर घडणार आहे. एखाद्या ट्रॅव्हल सिनेमाचा अनुभव देणारा हा चित्रपट नक्कीच लक्षवेधी ठरेल. गंगा नदीचं मनोहारी दृश्य आणि तिचा खळाळता प्रवाह यामुळे चित्रपटाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. महेश लिमये यांच्या नजरेतून दिसलेली दृश्य, त्यांचे दिग्दर्शन आणि अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रिट असं सगळं जमून आलेला हा चित्रपट आपल्याला अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल.

अमेय-वैदेही या हटके जोडीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे, त्यामुळे मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच पार पडला.

यावेळी चित्रपटाचे निर्माते पुनीत बालन, दिगदर्शक महेश लिमये, संगीतकार अजय-अतुल, अभिनेता अमेय वाघ, वैदेही परशुरामी, एव्हरेस्ट म्युझिकचे संजय छाब्रिया, एए फिल्म्सचे अनिल थडाणी, गीतकार गुरू ठाकूर, हास्यसम्राट समीर चौघुले, लेखक गणेश पंडित,अंबर हडप, पार्श्वसंगीतकार विजय गवंडे, अभिनेते हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, सुनील उर्फ राया अभ्यंकर आदी दिग्गज उपस्थित होते.

या सोहळ्यात अभिनेता अमेय वाघ आणि वैदेही परशुरामीने धडाक्यात एन्ट्री घेतली. अमेय वाघने खास 'जग्गू' शैलीत  सगळ्यांशी वार्तालाप करून हशा पिकवला.

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’ च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’ च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’  १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

Trailer Link:
https://www.youtube.com/watch?v=AwRV5n-jtWM

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight