पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता !
‘सिंधुरत्न कलावंत मंच’ आयोजित पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ आणि पारितोषिक वितरण सोहळा मालवण येथील मामा वरेरकर सभागृहात नुकताच दिमाखात संपन्न झाला. या चित्रपट महोत्सवात विवेक दुबे दिग्दर्शित ‘फनरल’ चित्रपट सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मानकरी ठरला. तर याच चित्रपटासाठी अभिनेता आरोह वेलणकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा व दिग्दर्शक विवेक दुबे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. अक्षया गुरवला ‘रिवणावायली’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटासाठी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करुन पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. ‘झी टॉकीज’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते.
पहिला कोकण चित्रपट महोत्सव ९ ते १४ मे या कालावधीत पार पडला. मराठीतील ३८ चित्रपटांनी यात सहभाग घेतला होता. त्यातील १४ चित्रपटांची परिक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवड केली होती. त्यातून विजेत्यांची घोषणा यावेळी करण्यात आली. या महोत्सवाचा समारोप समारंभ शनिवारी सायंकाळी मालवण येथील मामा वरेरकर सभागृहात पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, ज्येष्ठ अभिनेत्री आणि संस्थेच्या उपाध्यक्षा अलका कुबल आठल्ये यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेता दिगंबर नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
‘कोकण चित्रपट महोत्सव कोकणातील स्थानिक कलाकारांना संधी देणारा उत्तम मंच ठरावा’, अशी अपेक्षा सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेता विजय पाटकर यांनी व्यक्त केली. 'गुणी आणि उमेदीचे कलाकार प्रत्येक भागात असतात. केवळ पुणे-मुंबई इथेच सांस्कृतिक घडामोडी केंद्रीत होऊन चालणार नाही, या उद्देशाने आम्ही या कोकण चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली असून या माध्यमातून इथल्या कलाकारांना वाव मिळेल व कोकणातील सांस्कृतिक वैभव ते जगभरात दाखवतील' अशी आशा विजय पाटकर यांनी यावेळी व्यक्त केली. ‘कोकण चित्रपट महोत्सव कोकणातील कलासंस्कृतीला वेगळं वळण देणारा ठरेल’, असा विश्वास झी च्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री. बवेश जानवलेकर यांनी व्यक्त केला.
अतिशय कमी वेळात विजय राणे, प्रमोद मोहिते, यश सुर्वे, प्रकाश जाधव, उमेश ठाकूर, नूतन जयंत, शीतल कलापुरे तसेच मालवण येथील अवि सामंत, गणेश पाटील, हार्दिक शिगले आदिंनी पहिला कोकण चित्रपट महोत्सव यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
पुरस्कार विजेत्यांची नामावली पुढीलप्रमाणे
१) कथा - फनरल - रमेश दिघे
२) पटकथा - फनरल- रमेश दिघे
३) संवाद - रिवणावायली - संजय पवार
४) गीतकार - फिरस्त्या (नवा सूर्य)- गुरू ठाकूर
५) ध्वनीमुद्रक- प्रवास - अरविंद विजयकुमार
६) ध्वनिसंयोजन - जीवनसंध्या - परेश शेलार आणि समीर शेलार
७) वेशभूषा - कानभट्ट - अपर्णा होसिंग
८) रंगभूषा – कानभट्ट -संजय सिंग
९) कलादिग्दर्शक - कानभट्ट- सतीश चीपकर
१०) पार्श्वसंगीत - चोरीचा मामला - चिनार -महेश
११) संगीत - जीवन संध्या - अतुल भालचंद्र जोशी
१२) पुरुष गायक - फिरस्त्या -आदर्श शिंदे
१३) स्त्री गायक- रिवणावायली -अंजली मराठे
१४) संकलक- फनरल- निलेश गावंड
१५) छायाचित्र - हिरकणी- संजय मेमाणे
१६) नृत्यदिग्दर्शक- पांडू -विठ्ठल पाटील
१७) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – फनरल- विवेक दुबे
१८) सर्वोत्कृष्ट अभिनेता- फनरल - आरोह वेलणकर
१९) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- रिवणावायली - अक्षया गुरव
२०) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - फनरल- विजय केंकरे
२१) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - 8 दोन 75 फक्त इच्छाशक्ती हवी - शर्वाणी पिल्लई
२२) सर्वोत्कृष्ट खलनायक- मी पण सचिन-अभिजित खांडकेकर
२३) सर्वोत्कृष्ट विनोदी पुरुष कलाकार- चोरीचा मामला - जितेंद्र जोशी
२४) सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री- चोरीचा मामला- क्षिती जोग
२५) विशेष प्रोत्साहन चित्रपट - रिवणावायली -(प्रणाली मुव्हीज), फिरस्त्या - (झुंजार मोशन पिक्चर्स), शहीद भाई कोतवाल (स्वरजाई आर्ट् मीडिया प्रोडक्शन)
२६) सर्वोत्कृष्ट चित्रपट- प्रथम क्रमाक- फनरल (बिफोर आफ्टर एंटरटेनमेंट), द्वितीय क्रमांक - प्रवास (ओम छंगानी फिल्म), तृतीय क्रमांक- जीवन संध्या- (ड्रीम लाईन प्रोडक्शन एल.एल.पी)
२७) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - राजवीरसिंग राजे गायकवाड (भारत माझा देश आहे), देवाशी सावंत (भारत माझा देश आहे), रूचीत निनावे –(पल्याड), मृगवेद मुले (कानभट्ट), मृणाल जाधव (मी पण सचिन)
२८) विशेष पारितोषिक - अशोक सराफ – (प्रवास), किशोरी शहाणे – (जीवन संध्या), मोहन जोशी – (सीनियर सिटीजन), पद्मिनी कोल्हापुरे (प्रवास)
२९)सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट- पांडू (झी एंटरटेनमेंट एन्टर्प्राइजेज. लि.)
पत्रकारितेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या दै. सकाळचे संतोष भिंगार्डे, दै. लोकमतचे संजय घावरे आणि दै. लोकसत्ताच्या रेश्मा राईकवार यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
Comments
Post a Comment