फसक्लास दाभाडे'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला !

'फसक्लास दाभाडे' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित 

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी दाभाडे कुटुंबियांकडून मीडियासह सगळ्या प्रेक्षकांना आग्रहाचे निमंत्रण होते. या दिमाखदार सोहळ्यात दाभाडेंनी ट्रॅक्टरमधून जबरदस्त एंट्री करत सर्वांसोबत धमाल केली.  या सोहळ्याला क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह दाभाडे कुटुंबाचा भाग असलेले अनेक जण उपस्थित होते. 

हेमंत ढोमेचा चित्रपट म्हंटला की त्यात धमाल ही असतेच. कौटुंबिक विषय अतिशय हलक्याफुलक्या, मजेदार आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यात त्याचा हातखंडा आहे. हा चित्रपटही त्यापैकीच एक आहे. 'फसक्लास दाभाडे'च्या  घोषणेपासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यात आता ट्रेलरने भर टाकली आहे. ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबातील सदस्यांची आंबट गोड केमिस्ट्री पाहायला मिळत असून तायडी, सोनू आणि पप्पू यांच्यातील मजेदार नोकझोक दिसत असतानाच त्यांच्यातील भावनिक नातंही उलगडत आहे. विनोदासह हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली दाभाडे कुटुंबाची कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षक आता खूप उत्सुक आहेत. 

चित्रपटाबद्दल निर्माते भूषण कुमार म्हणतात, “ हेमंत ढोमेने यापूर्वी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार, सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रेक्षकांची कथेसोबत नाळ जोडणारे चित्रपट तो बनवतो. त्यामुळेच त्याचे चित्रपट प्रेक्षकांना जवळचे वाटतात. 'फसक्लास दाभाडे'मधील प्रत्येक व्यक्तिरेखा अनेकांना आपल्या घरातील, आजूबाजूची वाटेल. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सोहळाही अतिशय कमाल झाला असून ‘फसक्लास दाभाडे’ची धमाकेदार एंट्री पाहून चित्रपट देखील फर्स्टक्लास असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला असेलच. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळतेय. हा कौटुंबिक प्रवास सर्वांना आपलासा वाटेल याची खात्री आहे.”

निर्माते आनंद एल राय म्हणतात, “या चित्रपटात नात्यांची गुंफण आणि संघर्ष अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने सादर केला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकेल. एखादा चित्रपट तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा सगळे कलाकार एकत्र मनापासून आणि आपले समजून काम करतात. असाच प्रत्यय 'फसक्लास दाभाडे'च्या दरम्यान आम्हाला आला. पडद्यावर हे एक कुटुंब दिसत असले तरी पडद्यामागेही त्यांची केमिस्ट्री तितकीच छान होती. त्याचाच सकारात्मक परिणाम तुम्हाला पडद्यावर दिसणार आहे. नवीन वर्षात एक जबरदस्त चित्रपट पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर चित्रपटगृहातून बाहेर पडताना असेल.'' 

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ हा चित्रपट माझ्या गावात माझ्या मातीत शुट झाला असल्याने माझ्या खूप जवळचा आहे. आपल्या गावात आपला चित्रपट शुट करावा, असे खूप मनात होते आणि अखेर हे स्वप्न 'फसक्लास दाभाडे'च्या निमित्ताने पूर्ण झाले. या माझ्या कुटुंबात भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय हे सुद्धा सहभागी झाल्याचा मला आनंद आहे. सगळ्यांचेच मनापासून आभार. या चित्रपटात भावंडांची मस्ती आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेम पाहायला मिळेल तसेच दाभाडे कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या जीवनाशी कनेक्ट होईल. हा चित्रपट प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारा आहे तर कधी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक करणार सुद्धा आहे.'' 

‘फसक्लास दाभाडें'चे हे कुटुंब २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..