‘हुप्पा हुय्या २’ येणार !..
‘शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजेच हनुमान’
‘हुप्पा हुय्या २’ येणार !
‘हुप्पा हुय्या’ म्हटलं की ‘जय बजरंगा’ अशी गर्जना आपसूकच तोंडून निघते. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'हुप्पा हुय्या २' ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
पहिल्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापराने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मारुतीरायाने दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे आणि हीच आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड यांचा 'हुप्पा हुय्या २' रसिक प्रेक्षकांसाठी पूर्वीपेक्षा भव्यदिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने सज्ज होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले, ‘'हुप्पा हुय्या २' हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवेल, असा विश्वास मला आहे. आम्ही हा सिक्वेल तितक्याच उत्कटतेने आणि भव्यदिव्य पद्धतीने साकारणार आहोत’.
रानटी, हाफ तिकीट, धारावी बँक, इंदोरी इश्क, आयना का बायना, आश्चर्यचकीत, ३६ गुण या सारख्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या समित कक्कड यांच्यासारखा कल्पक आणि सिनेमाच्या तंत्रावर भक्कम पकड असलेला दिग्दर्शक याही चित्रपटाला कलात्मकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेईल यात शंका नाही. समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत ‘हुप्पा हुय्या २’ ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड हे करीत असून, संगीत-दिग्दर्शन अजित परब यांचे तर लेखन हृषिकेश कोळी यांचे आहे.
‘संकटात धैर्य, संघर्षात साहस आणि विजयात विनम्रता शिका’ अशी मारुतीरायाची शिकवण मानणाऱ्या 'हुप्पा हुय्या २'च्या घोषणेनंतर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
Comments
Post a Comment