डोंबिवलीकरांचा बुलंद आवाज..कार्यसम्राट लोकनेता काळाच्या पडद्याआड हरपला..

डोंबिवलीकरांचा सर्वसामान्य नागरिकांचा...हक्कांचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड हरपला...

केडीएमसीचे अभ्यासू ,ज्येष्ठ माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे निधन

डोंबिवली,२४ जुलै २०२३ : कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे अभ्यासू आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक, स्थायी समिती सभापती वामन सखाराम म्हात्रे यांचे रविवारी रात्री हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. आज सोमवारी दुपारी डोंबिवलीतील देवीचापाडा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह राजकीय, सामाजिक शैक्षणिक, व्यावसायिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी अंत्यदर्शन घेतले. डोंबिवलीच्या प्रश्नांवर नेहमीच उपेाषणाच्या माध्यमातून आवाज उठविणारे ‘ उपोषण सम्राट ’ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

१९९५ मध्ये कल्याण डोंबिवली पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट आली. या काळापासून वामन म्हात्रे यांनी चार टर्म नगरसेवक, तीन वेळा स्थायी समिती सभापती पद भुषविले. सभापती असताना विकासाची अनेक कामे मंजूर केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची निस्सीम श्रध्दा होती. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विश्वासातील निष्ठावान शिवसैनिक म्हणून वामन म्हात्रे यांची ओळख होती. वामन म्हात्रे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या महाराष्ट्रनगर परिसरातील घराबाहेर कार्यकत्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यांच्या अंत्ययात्रेत ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, महेश पाटील, रमेश पद्माकर म्हात्रे, समाजसेवक सुजीत नलावडे, प्रल्हाद म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, प्रकाश भोईर, रवी पाटील, रणजित जोशी, राजेश कदम,संतोष चव्हाण, उद्योजक मिलींद देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ ,शहर प्रमुख विवेक खामकर ,विधानसभा शहर संघटक प्रकाश तेलगोटे, पश्चिम शहर प्रमुख किशोर मानकामे, जिल्हा संघटक कविता गावंड, शहर संघटक किरण मोंडकर यांच्यासह सर्वच पक्षातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेतील गैरव्यवहारांची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढून चौकशीच्या फेऱ्यात अडकवली. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेतील भ्रष्टाचारावर त्यांनी आवाज उठविला. केडीएमसीतील टक्केवारीचा कारभार, बिल्डर, श्रीमंतांची कर थकबाकी, अनधिकृत नळजोडण्या, पाणी चोरीमुळे प्रशासनाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान, सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचा प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठविला. उपोषण हे त्यांचे महत्वाचे हत्यार होते. पाण्याच्या टाकीवरील उपोषण त्यांचे खूपच गाजले होते. उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला भाग पाडले.

पालिकेतील बहुचर्चित जलवाहिनी घोटाळयाचा पर्दाफाश करीत नगरसेवक, अधिकारी, कंत्राटदार यांना जेलची हवा दाखविण्यात वामन म्हात्रे यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे प्रशासनात त्यांची जरब होती. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही कंत्राटदारांना कामे देण्यासाठी त्यांच्याकडून ४१ टक्के कमिशन घेतले जात असल्याची तक्रार शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी केली होती. दिघेंच्या तक्रारीनंतर तत्कालीन राज्य सरकारने महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नंदलाल समिती नेमली होती. दिघेंच्या पावलावर पाऊल ठेवीत वामन म्हात्रे यांनी कसलीही तमा न बाळगता केडीएमसीतही ४३ टक्के कमिशन मोजावे लागत असल्याचा आरोप करीत यासाठी आवाज उठविला. याची तक्रार थेट ठाणे आर्थिक गुन्हे शाखा लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे केली. सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असतानाही त्यांनी प्रशासनातील अधिका-यांना कधीही पाठीशी घातले नाही. शिवसेनेतील कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांची महापौर होण्याची संधी दोन वेळा हुकली.

१९९५ साली पहिली निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधींची सत्ता अस्तित्वात आली. २००५ पासून अडीच वर्षाचा कालावधी सोडला तर महापालिकेवर शिवसेना भाजपचे वर्चस्व आहे. २००५ च्या निवडणुकीत वामन म्हात्रे आणि त्यांची भावजय कविता गोरखनाथ म्हात्रे हे अपक्ष म्हणून निवडून लढवून पक्षाला विजयी होऊन दाखवले होते. वॉर्डावरील आपली पकड त्यांनी पक्षाला दाखवून दिली होती. त्याचवेळी शिवसेना भाजपच्या सत्तेला सुरूंग लागला हेाता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुंडलिक म्हात्रे यांना महापौर करण्यासाठी वामन म्हात्रे यांचा खूप मोठा वाटा होता. म्हात्रे कुटूंबियांच्या दोन मतामुळे शिवसेनेचा महापौर पदावरील दावा गेला होता.

सामान्य कुटूंबात जन्मलेले आणि कुटूंबात कोणताही राजकीय वारसा नसताना वामन म्हात्रे यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तृत्वावर आपले राजकीय करिअर घडवले. मासळी विक्रेता ते नगरसेवक असा त्यांचा जीवन प्रवास होता. ज्ञानेश्वरीवर त्यांची अपार श्रध्दा होती. तुकाराम महाराजांचे अभंग तोंडपाठ होते. गेल्या चार पाच वर्षांपासून ते मधुमेहाने आजारी होते. त्यामुळे सक्रीय राजकारणापासून अलिप्त होते. त्यांच्या समाजसेवेचा वसा त्यांचे बंधू गोरखनाथ (बाळा) म्हात्रे आणि सुपूत्र अनमोल म्हात्रे हे पुढे चालवित आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight