ओडिशा
ओडिशातील बहुविध कृषी-हवामान क्षेत्र, उद्योगस्नेही वातावरण यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीला चालना : उद्योग विभाग
ठळक वैशिष्ट्ये
· 11 कृषी-हवामान क्षेत्रे आणि मोक्याच्या ठिकाणी असलेला समुद्रकिनारा यामुळे ओडिशाला कृषी आणि सीफूड प्रक्रियेतील गुंतवणुकीचा फायदा : उद्योग विभागाचे सचिव
· नुडलमेकर निस्सिनतर्फे खोर्धा फूड पार्क येथे सर्वात मोठे उत्पादन केंद्र उभारले जात असल्याचे भारतातील व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले
· गुंतवणुकीच्या संधींसंदर्भात या खात्याच्या मंत्र्यांनी बुधवारी चार महत्त्वाच्या बैठका घेतल्या
· ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करा, उद्योग मंत्र्यांचे मत
भुवनेश्वर, 26 ऑगस्ट : अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ओडिशा सादर करत आहे अनोखी गुंतवणूक संधी. बहुविध कृषी-हवामान क्षेत्र, भारतातील सुमारे 11 टक्के जलस्रोत आणि रेडी-टू-मूव्ह म्हणजेच संपूर्ण तयार सोयीसुविधा असा लाभही इथे आहे, असे आज झालेल्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये राज्याच्या उद्योग विभागाने नमूद केले.
इनव्हेस्ट इंडिया या गुंतवणुकीला चालना देणाऱ्या आणि त्यात साह्य करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या फूड प्रोसेसिंग अपॉर्च्युनिटीज इन इंडियन स्टेट्स (भारतातील राज्यांमधील अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी) या वेबिनारमध्ये ओडिशा सरकारने भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत ओडिशाला पसंती देण्यातील लाभ नमूद केले.
"गो स्विफ्ट फॉर इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन या पुरस्कारप्राप्त गुंतवणूक-स्नेही पोर्टल आणि अत्याधुनिक औद्योगिक सोयीसुविधा यामुळे ओडिशा अन्नप्रक्रिया उद्योगातील प्रगतीत वेगवान आघाडी घेत आहे. हे क्षेत्र ओडिशासाठी प्राधान्यक्रमाचे क्षेत्र ठरले आहे," असे या सादरीकरणादरम्यान ओडिशा सरकारच्या उद्योग विभागाचे मुख्य सचिव हेमंत शर्मा म्हणाले.
खोर्धा येथील फूड पार्कमध्ये अनेक अन्नप्रक्रिया कंपन्या आहेत. यात बहुराष्ट्रीय इंडो-निस्सिनचा समावेश आहे. इथे शीतपेये, बिस्किटे आणि नुडल्स असे अनेक पदार्थ तयार केले जातात.
निस्सिन उभारणार ओडिशातील सर्वात मोठे केंद्र
जपानमधील भव्य अन्नप्रक्रिया कंपनी इंडो निस्सिन आपल्या टॉप रेमनसारख्या ब्रँडसह गेली 30 वर्षे खोर्धा येथे कार्यरत आहे आणि याच भागात ते आपले दुसरे प्रक्रियाकेंद्र उभारणार आहेत. हे केंद्र भारतातील त्यांचे सर्वात मोठे केंद्र असणार आहे.
"आमच्या 30 वर्षांच्या इतिहासात ओडिशामध्ये गुंतवणूक करण्याचा आमचा निर्णय हा गुंतवणुकीसंदर्भातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता," असे इंडो निस्सिन फूडचे व्यवस्थापकीय संचालक गौतम शर्मा म्हणाले.
"ओडिशामध्ये आमच्याकडे सर्वोत्कृष्ट उत्पादन क्षमता आहेत आणि त्या आमच्यासाठी मापदंड ठरल्या आहेत. खोर्धामधील आमच्या उत्पादन केंद्रात वृद्धी केल्याने ओडिशामधील हे केंद्र आमच्यासाठी देशातील सर्वात मोठे केंद्र असेल," असे ते पुढे म्हणाले.
या नूडलमेकर कंपनीने आजवर ओडिशातील उत्पादन केंद्रासाठी 20 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि आणखी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांचे सक्षमीकरण
अन्नप्रक्रिया उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतात. स्थानिक पातळीवर पिकवण्यात आलेली फळे आणि इतर पदार्थ घेतल्याने राज्यातील ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी महिलांना फायदा होईल, असे ऊर्जा, एमएसएमई, उद्योग आणि गृहमंत्री कॅप्टन दिब्य शंकर मिश्रा यांनी या कार्यक्रमात सांगितले.
"आयुष्य बदलवण्याची आणि ग्रामीण व आदिवासी महिलांना सक्षम करण्याची क्षमता असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी ओडिशाची निवड करावी, अशी विनंती मी गुंतवणूकदारांना करतो," असे ते म्हणाले.
Comments
Post a Comment