'लगन'ची टिझरनं उत्सुकता वाढवली
टिझरनं वाढवली 'लगन'ची उत्सुकता
असंख्य कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या नानाविध व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा अनुभव प्रत्येकजण आपापल्या परीनं घेत असतो. त्यामुळं वरवर पाहता प्रेम जरी सोपं वाटत असलं तरी ते सोपं मात्र अजिबात नाही असं काहीसं सांगणारा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुमाला वाटतंय पण सोपं नायी… अशी टॅगलाईन असलेल्या या मराठी चित्रपटाचं शीर्षक 'लगन' असं आहे. ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे.
प्रेम म्हणजे एक गुलाबी अनुभूती... आपल्या आवडत्या व्यक्तीच्या विचारांत रमणं...आपल्याच विश्वात हरवून जाणं... तहान-भूक हरपणं... अशी काहीशी प्रेमाची लक्षणं सांगितली जातात. ही प्रेमाची एक बाजू झाली, पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या मुळीच नाहीत. कितीही संकटं आली, कितीही आव्हानं आली, नात्यांची बंधनं आड आली, स्वप्नांचा चुराडा होत असल्याचं जाणवलं तरीही जे टिकतं त्याला खरं प्रेम म्हणता येऊ शकतं... असाच काहीसा विचार मांडणाऱ्या सिनेमाची निर्मिती जी. बी. एन्टरटेन्मेंटनं 'लगन'च्या माध्यमातून केली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटात प्रेमाचे नवे रंग, नवे ढंग, प्रामाणिक भाव आणि नवी परिभाषा रसिकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज केल्यानं 'लगन' म्हणजे नेमकं काय आहे याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगड्या चित्रपटात एक नवी कोरी जोडी रसिकांच्या सेवेत रुजू होणार असली तरी तूर्तास सर्वच कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत. डीओपी सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी. शंकरम यांनी गायलेल्या गीतांना संगीतकार पी. शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांनी संगीतसाज चढवला आहे. पी. शंकरम यांनीच पार्श्वसंगीतही दिलं असून, विकास खंदारे यांनी साऊंड डिझाईन केलं आहे.
Comments
Post a Comment