गश्मीर आणि मृण्मयीची प्रेमकहाणी
‘विशू’मध्ये फुलणार गश्मीर आणि मृण्मयीची प्रेमकहाणी
मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' हा चित्रपट प्रेमाची एक अनोखी कहाणी घेऊन ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर झळकले होते.
समुद्राच्या संथ लाटांवर अलगद हेलकावे घेणारा ‘विशू’ म्हणजेच गश्मीर महाजनी यात दिसत होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून यात गश्मीरसोबत मृण्मयी गोडबोले दिसत आहेत. दोन वेगवेगळ्या विश्वात जगणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात नक्की काय घडामोडी चालू आहेत हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
‘विशू’च्या निमित्ताने गश्मीर आणि मृण्मयी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. निसर्गरम्य कोकण आणि तिथे हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला ‘विशू’मध्ये पाहायला मिळणार आहे. मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित या सिनेमात गश्मीर, मृण्मयीसह ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘’हा एक कौटुंबिक चित्रपट असून ‘विशू’मधून एक गोड प्रेमकहाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपटाविषयी मी जास्त काही बोलणार नाही फक्त एकच सांगेन की, काही गोष्टींची जाणीव आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’
श्री कृपा प्रॅाडक्शनचा ‘विशू’ हा दुसरा चित्रपट असून येत्या काळात श्री कृपा प्रॅाडक्शनचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बाबू कृष्णा भोईर यांची असून मयूर मधुकर शिंदे यांनी 'विशू'चे कथालेखन केले आहे. तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर छायाचित्रणाची धुरा मोहित जाधव यांनी सांभाळली आहे. तसेच ‘विशू’ला ऋषिकेश कामेरकर यांचे मधुर संगीत दिले असून या संगीताला मंगेश कांगणे यांचा आवाज लाभला आहे.
Comments
Post a Comment