महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड
महिंद्रा समूहाच्या बांधकाम क्षेत्र व्यवसायाशी तीन दशके संबंधित असलेले
अरुण नंदा महिंद्रा लाइफस्पेसेसमधून निवृत्त
मुंबई, २७ जुलै २०२२: महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडने आज अरुण नंदा यांची संचालक मंडळ आणि त्याच्या दीर्घकालीन अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या जागी अमित हरियानी पदभार स्वीकारणार असून ते २०१७ पासून मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत.
अरुण नंदा १९७३ मध्ये महिंद्रा समूहात रुजू झाले आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांना ऑगस्ट १९९२ मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M) च्या संचालक मंडळात सहभागी करण्यात आले आणि सामाजिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी मार्च २०१० मध्ये कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला. एप्रिल २०१० ते ऑगस्ट २०१४ पर्यंत ते M&M चे बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत राहिले. अरुण नंदा यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे संचालक, सीआयआय वेस्टर्न रिजन कौन्सिलचे अध्यक्ष, सीआयआय च्या कौशल्य विकास आणि लाईव्हलीहूड राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आणि हेल्पेज इंडियाच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणून काम केले. अरुण नंदा हे इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष एमेरिटस देखील आहेत. फ्रेंच प्रजासत्ताकचे अध्यक्ष श्री. निकोलस सार्कोझी यांनी २००८ मध्ये "चेव्हॅलियर दे ला लीजन डी'ऑनर" (नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर) या सर्वोच्च सन्मानाचे ते मानकरी असून विविध उद्योग संस्था आणि मिडिया कडून त्यांना अनेक जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
अरुण चेन्नई आणि नंतर जयपूर येथे पीपीपी मॉडेल अंतर्गत देशातील पहिले एसईझेड स्थापन करण्याच्या त्यांच्या अग्रेसर कार्यासाठी नेहमी स्मरणात राहतील. ते महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स (I) लिमिटेड आणि हॉलिडे क्लब रिसॉर्ट्स ओय., फिनलँडचे अध्यक्ष आणि महिंद्रा होल्डिंग्स लिमिटेडचेसंचालक म्हणून या पुढे ही कार्यरत राहतील.
या घोषणेबद्दल बोलताना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, "अरुण हे महिंद्रा ग्रुपचा एक अमूल्य भाग आहेत आणि विशेषत: सेवा व्यवसायात त्याची वाढ आणि विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी बांधकाम व्यवसाय आणि हॉस्पीटॅलिटी मध्ये समूह प्रवेश करताना नेतृत्व केले आणि महिंद्रा हॉलिडेज आणि महिंद्रा लाइफस्पेसेसची उभारणी केली. गेल्या काही दशकांपासून त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन या व्यवसायांची भरभराट होण्यास आणि समूहाच्या विविधतेत महत्त्वाचे योगदान देणारे ठरले. ग्रुपमधील इतर अनेक व्यवसायांसाठी ते मार्गदर्शक आहेत आणि त्यांचे सामाजिक क्षेत्र, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले कार्य हे प्रशंसनीय आहे. अरुण हा एक विश्वासू सल्लागार आणि मित्र राहिला आहे आणि तो ग्रुपमध्ये आणि उद्योगक्षेत्रात कार्यरत राहणार असल्याने मी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो."
आपल्या भावना व्यक्त करताना अरुण नंदा म्हणाले, "महिंद्रा समूहाशी जवळपास ५० वर्षे विविध पदांवर निगडीत राहिल्यामुळे मला धन्य वाटत आहे. यामुळे मला चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरीपासून इंट्राप्रेन्युअर बनण्याची संधी मिळाली. श्री केशुब महिंद्रा आणि आनंद यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि सक्षमीकरण यामुळे हे शक्य झाले. जसजसा मी पंच्याहत्तरीच्या जवळ पोहोचत आहे तसतसा मला ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करणाऱ्या आणि विशेषत: आदिवासी भागातील तरुणांच्या कौशल्यासाठी काम करणा-या माझ्या फाऊंडेशनमध्ये अधिक वेळ घालवायचा आहे. महिंद्रा लाइफस्पेसेसला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे कारण या व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच मी याच्याशी संबंधित आहे. कंपनी एका मजबूत व्यवस्थापनाच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पायावर आणि विकासाच्या मार्गावर असताना मी पद सोडत आहे याचे मला समाधान आहे. सातत्यपूर्ण विकास आणि यशासाठी मी कंपनीला शुभेच्छा देतो."
महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शाह म्हणाले, "महिंद्रा समूहावर सखोल ठसा उमटविणारे अरुण हे एक अतुलनीय नेते आहेत. त्यांनी जवळपास अर्ध्या शतकात समूहाचा पाया उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यात आमच्या बांधकाम व्यवसाय आणि हॉस्पिटॅलिटी विभागांच्या उभारणीचा समावेश आहे. महिंद्रा ग्रुपमधील त्यांच्या योगदानाची आणि महिंद्र वर्ल्ड सिटीजच्या उभारणीत त्यांच्या अग्रेसर कार्याची आम्ही मनापासून प्रशंसा करतो. कौशल्य विकासासारख्या महत्त्वपूर्ण उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महिंद्रा समूहाचा ते एक अविभाज्य भाग आहेत आणि पुढच्या पिढीला ते सतत पाठिंबा देत आहेत. महिंद्रा लाइफस्पेसेसच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून अमित हरियानी यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी विकासाच्या पुढील अध्यायाला सुरुवात करेल याचा विश्वास आहे. "
कॉर्पोरेट आणि व्यावसायिक कायदा, विलीनीकरण आणि अधिग्रहण, रिअल इस्टेट आणि रिअल इस्टेट फायनान्स व्यवहार याबाबत ग्राहकांना सल्ला सेवा देण्याचा ३५ वर्षांचा अनुभव असलेले अमित हरियानी हे देशातील आघाडीच्या वकिलांपैकी एक आहेत. ते हरियानी अँड कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार आहेत. अमीत यांनी आता वरिष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणून सल्लागार प्रॅक्टिसमध्ये बदल केला आहे आणि आरबिट्रेटर म्हणून काम केले आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये वक्ते म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते आणि ते खूप लेखन करतात. त्यांनी "रिअल इस्टेट कायदे" या विषयावर एक पुस्तक लिहिले आहे. अमीत हे आरोग्य समस्यांशी संबंधित मुलांना मदत करणारी संस्था असलेल्या हीलिंग टचचे विश्वस्त आहेत. अमीत हे महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक देखील आहेत.
Comments
Post a Comment