‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२२’
फक्त मराठी सिने सन्मान २०२२: धर्मवीरची बाजी, चंद्रमुखीचा डंका..
(BDN),मुंबई,३० जुलै २०२२ः ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२२’ मोठ्या थाटात आणि दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत २७ जुलै रोजी अंधेरी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत होते अमेय वाघ आणि ओमकार भोजने. दोघांच्याही विनोदकौशल्याने कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत निवेदनाची जबाबदारी उत्कृष्ठरीत्या पार पाडली. आशिष पाटीलच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला.
तसेच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची शान म्हणजेच गायक आणि संगीतकार अजय-अतुल. अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांना वेडावून टाकणारे सूर आणि संगीत देऊन मराठीचा झेंडा सात समुद्रापार नेणाऱ्या या जादुई जोडीचा ‘फक्त मराठीने’ विशेष सन्मान जाहीर केला. सन्मान स्वीकारण्यासाठी आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना विको पॉप्युलर फेस ऑफ द इयर या सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.
त्याचबरोबर आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला ज्यांनी गेले कैक दशकं उत्तमोत्तम भूमिकांनी आणि चित्रपटांनी खिळवून ठेवलं ते म्हणजे विनोदाचे बादशाह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा देखील सन्मान ‘फक्त मराठीने’ केला. तसेच त्यांच्या काही गाजलेल्या विविध भूमिकांना घेऊन कलाकारांनी त्यांना मानवंदना म्हणून काही स्किट्स सादर केले. सचिन पिळगावकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनीला शरद पिळगावकर यांच्या हस्ते ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा सन्मान प्रसाद ओक यांना धर्मवीर चित्रपटासाठी प्राप्त झाला. तसेच सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा सन्मान अमृता खानविलकर हिला चंद्रमुखी चित्रपटासाठी प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ठ कथाकार हा सन्मान विश्वास पाटील यांना चंद्रमुखी चित्रपटासाठी मिळाला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा सन्मान धर्मवीर चित्रपटासाठी प्रवीण तरडे यांना मिळाला. व सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा सन्मान “धर्मवीर”ने पटकावला.
फक्त मराठी सिने सन्मान सोहळ्याच हे पाहिलंच वर्ष. अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला येऊन फक्त मराठीशी असलेलं नात अधिक घट्ट केल आहे. सोनाली कुलकर्णी, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांच्या दमदार नृत्याने सर्वानाच वेड लावलं.
हा सोहळा लवकरच 'फक्त मराठी' या वाहिनीवर प्रेक्षकांसाठी प्रसारित करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment