शिवप्रताप गरुडझेप
'शिवप्रताप गरुडझेप' मधील 'बम बम भोले' प्रेक्षक पसंतीस
शिवचरित्रातील महत्त्वाचा अध्याय असलेल्या ‘आग्र्याहून सुटकेचा’ थरार लवकरच 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. त्याअगोदर या चित्रपटातील ‘बम बम भोले’ हे शिवशंकर आराधनेचे गीत प्रेक्षकांसमोर आले आहे. अंगाला भस्मविभूती फासलेल्या, जटाधारी साधूंच्या जबरदस्त नृत्यविष्काराने हे गीत आकर्षणाचा विषय ठरत आहे. अल्पावधीतच हे गीत सर्वत्र व्हायरल झालेले दिसते आहे.
महाविरागी सदा अभोगी करीत त्रिलोक विहार
सबसुख त्यागी स्मशान योगी भोले विश्वाधार
‘बम बम भोले, बभूतवाले बम बम भोले’
अशी अतिशय आशयघन शब्दरचना गीतकार ऋषीकेश परांजपे यांची असून संगीत शशांक पोवार यांचे आहे. दीपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन आहे तर छायांकन संजय जाधव यांचे आहे. या गाण्यातला जोश प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या नृत्याविष्काराच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या भेटीसाठी आलेले छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या लालकिल्ल्यात आत्मविश्वासाने प्रवेश करताना दिसत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्रा येथे झालेली भेट, महाराजांची नाट्यमय सुटका यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या हिंदुस्थानाला दाखवून दिलेल्या आपल्या बुद्धीचातुर्याची आणि मुत्सदेगिरीची कथा आपल्याला 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ‘महाराजांनी प्रत्येकामध्ये आत्मविश्वास आणि चेतना जागवली. हे गाणंही तसंच असून प्रत्येकाला या गाण्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास चित्रपटाचे निर्माते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये 'शिवप्रताप गरुडझेप' प्रेक्षक दरबारी दाखल होणार आहे.
Comments
Post a Comment