राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 13 सप्टेंबर 2023 रोजी 'आयुष्मान भव' मोहिमेचा करणार प्रारंभ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 13 सप्टेंबर 2023 रोजी 'आयुष्मान भव' मोहिमेचा करणार प्रारंभ
आयुष्मान भव हा प्रत्येक गावात आणि शहरात आरोग्य सेवा योजनांची परिपूर्ण व्याप्ती सुनिश्चित करणारा सर्वसमावेशक देशव्यापी आरोग्य सेवा उपक्रम
प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळण्याच्या सुनिश्चितीसाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान 'सेवा पंधरवडा '
आयुष्मान - आपके द्वार 3.0, आरोग्य आणि निरामयता केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष्मान मेळावे आणि प्रत्येक गाव व पंचायतीमध्ये आयुष्मान सभा या आयुष्मान भारतच्या तीन घटकांद्वारे आरोग्य सेवांची परिपूर्ण व्याप्ती
आयुष्मान कार्ड प्रदान करणे, आभा ओळखपत्र निर्माण करणे आणि महत्वाच्या आरोग्य योजनांबद्दल आणि असंसर्गजन्य रोग, क्षयरोग आणि सिकलसेल यांसारख्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आयुष्मान भवचे उद्दिष्ट
आयुष्मान भव उपक्रमाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने झालेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रशासनांशी आभासी पद्धतीने संवाद साधला
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2023
भारतातील आरोग्यसेवा सुगम्यता आणि सर्वसमावेशकता यांची व्यापकता वाढवण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, 13 सप्टेंबर 2023 रोजी दूरदर्शी 'आयुष्मान भव' मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. आभासी कार्यक्रमाद्वारे हा ऐतिहासिक प्रारंभ होईल. सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा साध्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी आरोग्य सेवा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि प्रा. एसपी सिंह बघेल, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल, अनेक खासदार आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यांचे मंत्री तसेच विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. जिल्हा मुख्यालये, तालुका मुख्यालये आणि गावागावांतील आरोग्य आणि निरामयता केंद्रांमधून मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, लाभार्थी आणि सहभागी देखील यावेळी उपस्थित राहतील.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेली 'आयुष्मान भव' मोहीम हा एक सर्वसमावेशक देशव्यापी आरोग्य सेवा उपक्रम असून त्याचा उद्देश आरोग्य सेवांची व्याप्ती देशातील प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत पोहोचवणे हा आहे. हा महत्त्वाचा उपक्रम आयुष्मान भारत कार्यक्रमाच्या यशावर आधारित आहे आणि आरोग्य देखभाल सेवांमध्ये एक आमूलाग्र बदलाचे द्योतक आहे.
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 'सेवा पंधरवडा ' दरम्यान राबविण्यात येणार्या या मोहिमेमध्ये 'संपूर्ण राष्ट्र' आणि 'संपूर्ण समाज' असा दृष्टिकोन आहे. एका सामायिक अभियानांतर्गत कुठलीही विषमता न राखता, कोणालाही न वगळता प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळेल या सुनिश्चितीसाठी सरकारी क्षेत्रातील संबंधित,नागरी सामाजिक संस्था आणि समुदाय यांना एकत्र आणले जाईल.
आयुष्मान भव मोहीम हा ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज संस्था, आरोग्य विभाग, इतर सरकारी विभाग यांच्या समन्वयाने ग्रामपंचायतींद्वारे चालवण्यात येणारा एक सहयोगी प्रयत्न आहे. भौगोलिक अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गाव आणि शहरापर्यंत सर्वसमावेशक आरोग्य सेवा पोहचवणे आणि कोणीही वंचित राहू नये, याची सुनिश्चिती हे याचे मूळ उद्दिष्ट आहे.
या समन्वयवादी दृष्टिकोनाचा उद्देश आयुष्मान - आपके द्वार 3.0, आरोग्य आणि निरामयता केंद्रे आणि समुदाय आरोग्य केंद्रे येथे आयुष्मान मेळावे आणि प्रत्येक गाव व पंचायतीमध्ये आयुष्मान सभा, या तीन घटकांद्वारे आरोग्य सेवांची परिपूर्ण व्याप्ती साधणे हा आहे.
आयुष्मान आपके द्वार 3.0: या उपक्रमाचे उद्दिष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत अत्यावश्यक आरोग्य सेवांच्या सुनिश्चितीसाठी पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या उर्वरित पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड प्रदान करणे हे आहे.
आरोग्य आणि निरामयता केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष्मान मेळाव्यांचे आयोजन: आयुष्मान भारत- आरोग्य आणि निरामयता केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये आयोजित मेळाव्यांमध्ये आभा ओळखपत्रे (ABHA,आरोग्य ओळखपत्र)आयुष्मान भारत कार्ड तयार करून ती वितरीत करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लवकर रोगनिदान करणे, सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरविणे, तज्ञांकडून दूरध्वनीवरून सल्ला घेणे आणि गरजेनुसार योग्य विशेषज्ञाचा सल्ला देखील इथे दिला जाईल.
आयुष्मान सभा: प्रत्येक गावात आणि पंचायतीत आयोजित हे मेळावे आयुष्मान ओळखपत्रांचे वितरण, आभा आरोग्य ओळख पत्रे तयार करण्यात आणि महत्वाच्या आरोग्य योजना आणि असंसर्गजन्य रोग, क्षयरोग आणि सिकलसेल रोग यांसारख्या आजारांबद्दल जनजागृती निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
आयुष्मान भव ही मोहीम भारतात सार्वत्रिक आरोग्य विस्ताराचा पाया रचून 'निरोगी गावे' आणि 'निरोगी ग्रामपंचायती' निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. ज्या पंचायती आरोग्य योजना यशस्वीपणे राबवतील , त्यांना 'आयुष्मान ग्रामपंचायत' किंवा 'आयुष्मान अर्बन वॉर्ड' हा समान आरोग्य सेवा तरतुदीप्रति समर्पणाचे प्रतीक असलेला प्रतिष्ठित किताब मिळेल.
आयुष्मान भव उपक्रमाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने देशभर सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज देशातील राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रशासनांतील आरोग्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधला.
यावेळी बोलताना, सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रशासने यांच्यासाठी आयुष्मान भव उपक्रम किती महत्त्वाचा आहे यावर केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय यांनी प्रकाश टाकला. सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या क्षेत्रातील आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांमध्ये दर वर्षी आरोग्य मेळावे आयोजित करावे यावर त्यांनी अधिक भर दिला तसेच प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने ब्लॉक पातळीवर आरोग्य शिबिरे भरवावीत अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. या उपक्रमांमुळे आरोग्य मेळाव्यात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तेथे वेळेवर उपचार उपलब्ध होण्याची खात्रीलायक व्यवस्था होईल यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.
स्वच्छता आणि उत्तम आरोग्य यांचा परस्पर संबंध अधोरेखित करत, देशातील प्रत्येक गावामध्ये येत्या 2 ऑक्टोबरला स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल याची सुनिश्चिती करून घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांना दिले. आयुष्मान भारत उपक्रमात अनुक्रमे सहावा आणि सातवा स्तंभ म्हणून समावेश करण्यात आलेल्या अवयव-दान आणि रक्तदान या कार्यक्रमांचे महत्त्व देखील त्यांनी विषद करून सांगितले.
Comments
Post a Comment