गोव्यात धुमधडाक्यात साजरी होणार शासकीय शिवजयंती
गोव्यात धुमधुडाक्यात साजरी होणार शासकीय शिवंजयती
फर्मागुढी किल्ल्याची डागडुजी करुन गोवा सरकार उभारणार वारसा संग्रहालय
पणजी, 29 सप्टेंबर 2023: आगामी शिवजयंती गोव्यात शासकीय स्तरावर धुमधडाक्यात साजरी करणार असल्याची घोषणा गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. पर्यटन उच्चाधिकार समितीची बैठक झाल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पर्यटन गोवाचे संचालक सुनील अंचिपाका भाप्रसे, टेंपल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी आणि पर्यटन उच्चाधिकार समितीचे सदस्य उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याशी अनोखे नाते होते. महाराजांनी फर्मागुढीचा किल्ला आदिलशहाकडून जिंकला होता. महाराजांच्या निधनानंतर किल्ला पोर्तुगीजांकडे गेला होता. त्यावेळी संभाजी महाराजांनी किल्ल्यावर चढाई केली. पोर्तुगिझांनी संभाजी महारांजांसमोर गुडघे टेकत किल्ला परत दिली. पेशव्यांनी तो राखला मात्र मराठेशाही लयास गेल्यानंतर किल्ल्यावर पुन्हा पोर्तुगिझांचे वर्चस्व राहिले. गोवा मुक्ती संग्रामानंतर गोवा भारतात विलीन झाला, किल्ला भारताच्या ताब्यात आला. अनेक लढाया पाहिलेल्या या किल्ल्याने तोफेचे गोळे झेलले आहेत. त्यामुळे काही बुरुज ढासळलेले आहेत. दुरावस्था झालेल्या या किल्ल्याची डागडुजी करून तो सुंदर करण्यात येईल. या ठिकाणी ऐतिहासिक वारसा जपणारे संग्रहालय उभारण्यात येईल. शिवाय शासकीय स्तरावरून गोव्यातील ६ शहरांत शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात येईल, असे गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सोबतच अध्यात्मिक पर्यटन स्थळ बनविण्याचा मानस देखील व्यक्त केला. योग, वेलनेस पर्यटनावर भर देत अध्यात्मिक पर्यटन पुढे नेण्याचा विचार देखील त्यांनी व्यक्त केला.
पर्यटनांतर्गत गोव्यातील प्रसिद्ध मंदिरे एकमेकांशी जोडण्यात येणार आहे. किनारपट्टी सोडून इतर ठिकाणाची पर्यटनस्थळे देखील विकसित होणे गरजेचे आहे. गोवा हे अध्यात्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध होऊ शकते. मोपा विमानतळावरून उत्तराखंड, नागपूर, डेहराडून आणि गुवाहाटी या ठिकाणी थेट उड्डाण सेवा सुरु करून उत्तर काशी व दक्षिण काशी दरम्यान सेतू साधून तो गोव्याशी जोडण्यात येईल. जेणेकरून गोव्याकडे अधिक संख्येने पर्यटक आकर्षित होतील असे मंत्री खंवटे म्हणाले.
योग, वेलनेस आणि इतर अध्यात्मिक अनुभव समृद्ध करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात पर्यटन परिषद आयोजित करणार असल्याची माहिती देखील खंवटे यांनी दिली. अध्यात्मिक पर्यटन स्थळांची एकमेकांशी जोडणी, अध्यात्मिक स्थळांचा विकास हे या परिषदेचे उद्दिष्ट्य असेल.
अध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी समर्पित असणाऱ्या टेंपल कनेक्ट संस्थेसोबत गोवा सरकारने सामंजस्य करार केला आहे. गोव्याची अध्यात्मिक ओळख वाढवण्यासाठी आणि जतन करण्यात युवक, युवा टुरिझम क्लब आणि विद्यार्थ्यांचा सहभाग ठळकपणे दिसून आला. राज्यातील मंदिरे आणि अध्यात्मिक स्थळांचा अस्सलपणा आणि पावित्र्य राखण्यासाठी तरुण पिढीला सहभागी करून घेण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्री रोहन ए. खंवटे यांनी मिळालेल्या उत्तम प्रतिसादाच्या आधारे आयर्नमॅन 70.3 साठी व्यावसायिक प्रायोजकत्व आयोजित करण्याची शक्यता नमूद केली. याद्वारे, क्रीडा पर्यटनाला चालना देण्याचा आणि जगभरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि साक्षीदार होण्यासाठी आकर्षित करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
गोव्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. या मंदिराचा इतिहास व इतर माहिती पर्यटकांना दिली जावी यासाठी मंदिर कनेक्ट ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेस गोवा सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच आता गोव्यातील मंदिरे पर्यटकांशी कनेक्ट होणार असल्याची माहिती टेंपल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी दिली.
Comments
Post a Comment