जागतिक कीर्तीचे चित्रकार राबीन बार यांच्या चित्रांचे प्रदर्शन
जागतिक कीर्तीचे चित्रकार राबीन बार यांच्या चित्रांचे प्रदर्शन
मुंबईतील जहांगीर आर्ट गँलरीत
दि.२ ते ८ आँक्टोबर,दरम्यान भव्य प्रदर्शन
एकाच वेळी दोन हात आणि एका पायाने चित्र काढण्याचा जागतिक विक्रम करणारे जागतिक कीर्तीचे चित्रकार स्पीड पेंटर राबीन बार यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन “डिवाईन” हया शीर्षकांतर्गत मुंबईत काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. हया प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते झाले. हया प्रसंगी आम आदमी पार्टीचे नेते, अॅड. धनराज वंजारी, राजेंद्र पाटील (अध्यक्ष, बॉम्बे आर्ट सोसायटी), डॉ. गणेश तरतरे (प्रा. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट) यांच्यासहित कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन रसिकांना दि. २ ते ८ ऑक्टोबर, २०२३ ह्या दरम्यान ११ ते ७ हया वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे.
चित्रकार राबीन बार यांनी प्रदर्शनात प्राचीन पौराणिक कथांमधील शक्तिशाली देव – देवता ते ध्यानाच्या शांत आकृत्यांपर्यंत विविध परंपरांच्या देवतांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे कला प्रदर्शन पवित्र आणि गूढ गोष्टींचा शोध घेण्यासाठी पृथ्वीवरील सीमा ओलांडते. त्यांची कला दाखवण्याची नाही तर परमात्माशी प्रगाढ संबंध जोडण्याची, अध्यात्माची खोली शोधण्यासाठी आहे. देवतांच्या चिरंतन आकर्षणाचा, मानवी सर्जनशीलतेचा उत्सव आणि विश्वातील रहस्यांचा विचार त्यांनी आपल्या चित्रातून प्रकट केला आहे.
आसामचे राबीन बार हे जगप्रसिद्ध चित्रकार असून भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि मा. उपाध्यक्ष वेंकैय्या नायडू यांनी त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे. सर्जनशील कल्पनांची रचना करण्याच्या त्यांच्या कलागुणांवर आधारित ४५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या कलावंताची खास ओळख म्हणजे ते दोन्ही हात आणि एका पायाने एकाचवेळी चित्रे काढतात. त्याचा त्यांनी दोनदा जागतिक विक्रम नोंदवला आहे. कलर्स टीव्ही, सोनी टीव्ही, झी टीव्ही, ईटीव्ही बांगला, ईटीव्ही मराठी, तामिळ, तेलगु, न्यूज लाईन, झी न्यूज अशा आघाडीच्या वाहिन्यांवर त्यांनी अद्भुत शो सादर करून प्राइम टाइम स्पेशलच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. पश्चिम बंगालमधील हावडा येथे जन्मलेल्या राबीन बार हे बालपणापासून विलक्षण सर्जनशीलता दर्शवणारे एक चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रांमधील वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती रसिकांना प्रभावित करणाऱ्या असून हा वैचारिक कलाविष्कार सर्वांना आवडेल असाच आहे.
Comments
Post a Comment