‘मन मतलबी’ गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा
'मन मतलबी' गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा
'शॉर्ट ॲन्ड स्वीट' चित्रपटातील गाणे प्रदर्शित
वडील आणि मुलाच्या नाजूक नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट ॲन्ड स्वीट’ या चित्रपटातील ‘मन मतलबी’ हे भावनाप्रधान गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मंगेश कांगणे यांचे बोल लाभले आहेत तर हे हृदयस्पर्शी गाणे नकाश अझीझ यांनी गायले आहे. हर्षद अतकरी याच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे बोल मनाच्या खोलवर जाणारे आहेत.
हर्षदचा कॅालेज हॅास्टेलपासून घरापर्यंतचा प्रवास या गाण्यात दिसत असून या दरम्यान त्याला अशा गोष्टी दिसत आहेत, ज्या त्याच्या मनाला अस्वस्थ करत आहेत. मनात त्याच्या काही द्वंद सुरू आहे. अतिशय श्रवणीय असे हे गाणे असून प्रत्येक शब्दात भावार्थ आहे.
या गाण्याबद्दल दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ‘’ मन मतलबी या दोन शब्दांमधूनच बऱ्याच भावना व्यक्त होत आहेत. गाण्यातच वडिल आणि मुलाच्या नात्यातील अनेक तऱ्हा दिसत आहेत. हे नाते वरवर पाहता खूप कठोर दिसत असले तरी खूप हळवे आणि संवेदनशील असे आहे. त्यामुळे प्रत्येक मुलगा आणि वडिल हे गाणे स्वतःशी जोडू शकतील. गाण्याची टीमही दमदार आहे.’’
शुभम प्रोडक्शन निर्मित, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Comments
Post a Comment