'डाक' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला...
'डाक' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला...
विविधांगी चित्रपटांसाठी जगभरातील सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये मागील काही दिवसांपासून एका भयपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'डाक' असं या मराठी चित्रपटाचं टायटलच खूप विचार करायला लावणारं आहे. आशयघन कथानकाला सामाजिक संदेशाची किनार जोडत बनवण्यात आलेला 'डाक' चित्रपट मराठीतील भयपटांची उणीव भरून काढणारा आहे. नुकताच 'डाक'चा लक्षवेधी ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरचं प्रचंड कौतुक सुरू असून, ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
निर्माते रतिश तावडे आणि महेश नेने यांनी महेश नेने प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'डाक'ची निर्मिती केली आहे. देवांग गांधी यांचे या चित्रपटाला विशेष सहकार्य लाभलं आहे. महेश नेने यांनी निर्मितीसोबतच 'डाक'चं यशस्वी दिग्दर्शनही केलं आहे. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एंटरटेन्मेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम सिनेरसिकांपर्यंत हा चित्रपट पोहोचणार आहे. हा चित्रपट केवळ प्रगतीपथावर असलेल्या समाजाच्या वाटेत अडसर ठरणाऱ्या चालीरितींवर प्रहार करणारा नसून, यातील मर्डर मिस्ट्री रसिकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी आहे. १३ ऑक्टोबरपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
'डाक' हा केवळ एक भयपट नसून, कथानकातील वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांना तसेच घडणाऱ्या घटनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न यात आहे. या चित्रपटात प्रामुख्याने डाक या प्रथेवर भाष्य करण्यात आलं आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बाराव्या दिवशी डाक घालून मृत व्यक्तीच्या आत्म्याला बोलावून तो अचानक गेल्याचं कारण विचारलं जात असे. हि प्रथा आजही कित्येक भागांमध्ये केली जाते. यावर आधारलेली एक थ्रिलर, मर्डर मिस्ट्री म्हणजेच 'डाक' हा चित्रपट आहे. महेश नेने यांनी या चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच लेखनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाद्वारे मराठमोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकर पुन्हा मराठीकडे वळली आहे. अश्विनी काळसेकर, संजीवनी जाधव, अनिकेत केळकर, प्रणाली धुमाळ, गुरू दिवेकर, वेदांगी कुलकर्णी, सिद्धांथ मुळे, ओमकार राणे, भूमी शिरोडकर, किर्ती आडारकर, जनार्दन कदम आदी कलाकारांनी या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. नरेन गेडीया यांनी छायाचित्रण केलं असून, प्रवीण जहागीरदार यांनी संकलन केलं आहे. गीतकार मंदार चोळकरने लिहिलेलं गीत मुग्धा कऱ्हाडे यांनी गायले असून, संगीतकार स्वप्नील-प्रफुल्ल यांनी संगीतबद्ध केले आहे. अनुराग गोडबोले यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, रोहन आगाशे यांनी साऊंड डिझाईन केलं आहे.
Comments
Post a Comment