मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या राजेश देशपांडे, श्रीकांत बोजेवार, श्याम पेठकर, राहुल वैद्य व विवेक आपटे या प्रतिनिधींच्या मंडळाने माननीय सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
१. लेखकाला आपल्या नाटकाचे किंवा चित्रपटाचे शीर्षक स्वतःच्या नावाने रजिस्टर करता यावे,
२. कविता गीते व संवादातील विशिष्ट शब्दरचना मालिकेचे शीर्षक म्हणून वापरली गेली तर मूळ लेखकाला त्याचे उचित श्रेय व वन टाइम पेमेंट स्वरूपात मानधन मिळावे,
३. चित्रपटाच्या दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि मुख्य कलाकारांप्रमाणेच लेखकाचेही, ना हरकत प्रमाणपत्र (NOC) असल्याशिवाय या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट दिले जाऊ नये, या अस्तित्वात असलेल्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,
४. कॉपीराईट रजिस्ट्रेशन दिल्लीप्रमाणेच मुंबईतही व्हावे,
५. वृद्ध व विकलांग लेखकांसाठी पेन्शन योजना असावी, व
६. मानाचि लेखक संघटनेला त्यांच्या कार्यालयासाठी व त्यांचे विविध उपक्रम राबवण्यासाठी सरकारी आस्थापनात जागा मिळावी,
या लेखकांच्या प्रमुख मागण्या होत्या. या मुद्द्यांवर माननीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा झाली. माननीय मंत्र्यांनी यातील काही मुद्द्यांवर चित्रपट महामंडळ, चित्रनगरीचे संचालक व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी वरीलपैकी काही समस्या सोडवण्यासाठी यथायोग्य मार्ग काढावा, असे सुचवले. त्याबाबत मानाचि लेखक संघटना आवश्यक ती पावले उचलेल.
Comments
Post a Comment