सागर कारंडे बनला डीन
देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे आणि ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सागर कारंडे साकारणार आहे. सागर हा मोनिकाचा मित्र विक्रांत आणि कॉलेजचा डीन असणार आहे. आता तो देवा आणि मोनिकाच्या मध्ये येणार का किंवा मोनिका देवाला सोडून विक्रांत सोबत जाणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळेल.
या नवीन भूमिकेबद्दल बोलताना सागर म्हणाला, "बऱ्याच दिवसांपासून डॉक्टर डॉन मालिकेत कॉलेजचे नवीन डीन विक्रांत यांच्याबद्दल खूप चर्चा चालू आहे आणि विक्रांतची भूमिका मला साकारायला मिळाली याबद्दल मी खूप आनंदी आहे. खूप वर्ष कॉमेडी केल्यानंतर कलाकाराला नेहमीच काहीतरी वेगळं करायची इच्छा असते आणि मी नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या शोधात असतो. याआधी मी काही मालिकांमध्ये गेस्ट एपियरन्स केलं आहे. ४ - ५ भागांसाठी ती व्यक्तिरेखा असून तिची सुरुवात व शेवट मला माहिती असतो. पण इथे डॉक्टर डॉन मध्ये मला विक्रांतची सुरुवात कळली आहे, त्याचा शेवट काय असणार आहे हे प्रेक्षकांप्रमाणेच माझ्यासाठी देखील सरप्राईज असणार आहे. पण विक्रांतची व्यक्तिरेखा खूपच इंटरेस्टिंग आहे. तो खूपच आनंदी माणूस आहे, सगळ्यात मिळून मिसळून राहणार आहे, विद्यार्थांना देखील मित्राप्रमाणे वागवणारा आहे आणि त्याच मोनिकावर मनापासून प्रेम आहे, म्हणूनच तो भारतात परत आला आहे. एकाच व्यक्तिरेखेच्या अनेक छटा सादर करण्याची संधी मला विक्रांत साकारताना मिळाली. विक्रांत साकारताना मी माझे १००% देतोय आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."
Comments
Post a Comment