कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा
प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आयोजन
‘पीपल्स आर्ट सेंटर’ने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी २०२१ रोजी आयोजित केलेला त्यांचा १०३२ वा कार्यक्रम अतिशय अनोख्या रीतीने करून हा प्रजासत्ताक दिवस एकदम खास करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी ज्यांनी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च केले त्यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात येणार आहे.
ही साथ पूर्णतः अनपेक्षित आणि अभूतपूर्व विनाशकारी अशी होती. तिच्यामुळे सारे जग उलटेपालटे झाले आणि लोकांना या अभूतपूर्व परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले. त्याच्या वैद्यकीय परिणामाबरोबरच त्याच्या आर्थिक दुष्परिणामाचाही लोकांना जबरदस्त फटका बसला. भारतात तर गरीब वर्गात अनेक जण असे आहेत जे रोजंदारीवर जगतात. मुंबईत तर खूप मोठ्या संख्येने स्थलांतरित राहतात, ज्यांना ना घर उरले, ना काम. सरकारने आपल्या परीने त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा खूप प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थाने पुढे आले ते या शहरातले अत्यंत सहृदय असे स्त्री व पुरुष, ज्यांनी समाजातल्या या दुर्बल घटकांप्रती अत्यंत कौतुकास्पद अशी संवेदना दाखवली.
या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठीच या कार्यक्रमाला ‘कोविड योद्धे सन्मान सोहळा’ असे नाव देण्यात आले असून मुंबई व आसपासच्या भागांत पसरलेल्या साथीचा मुकाबला करण्यासाठी ज्यांनी आपल्या परीने खूप काही केले त्यांचा सन्मान यात करण्यात येईल. त्यातले काही नामवंत आहेत, तर काही प्रकाशझोतात नसलेले, पण सहृदयी लोक आहेत ज्यांनी पदरमोड करून या काळात लोकांना मदत केली.
हा सन्मान सोहळा मंगळवार २६ जानेवारी २०२१ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ३.३० वा. पार पडेल. ‘पीपल्स आर्ट सेंटर’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचा एक भाग असेल. या कार्यक्रमात मुंबई व आसपासच्या भागातील, विविध क्षेत्रांतील २० सेवाभावी लोकांचा सन्मान करण्यात येईल.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते श्री. प्रवीण दरेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. आमदार श्री. सदा सरवणकर, मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर, श्री.रमेश चंदर [आयुक्त,जी अँड एस टी], तसेच अन्य मान्यवर अतिथी असतील. कार्यक्रमाला सर्वांचे स्वागत असले तरी कोविड संदर्भातील राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच प्रवेश दिला जाईल.
Comments
Post a Comment